सोलापूर : करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सात वर्षांपासून थकीत आहे. ‘एनसीटीसी’मार्फत १४० कोटी रुपयांचे कर्ज देऊन सुद्धा कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची वेतनाअभावी उपासमार सुरू आहे. या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर उपोषण करण्याचा इशारा सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या करमाळा तालुका शाखेने दिला आहे.
मकाई साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्या कारखान्याला एनसीटीसीमार्फत १४० कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले होते. परंतु तरीही गेल्या ५५ ते ६० महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कर्मचारी तरसत आहेत. त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा हिस्साही २०१६ पासून भरण्यात आला नाही.
कर्मचाऱ्यांनी यापूर्वी कारखाना अडचणीत असताना स्वतःच्या नावावर वैयक्तिक कर्ज काढून कारखान्याला मदतीचा हातभार उचलला होता. परंतु सध्या या कर्मचाऱ्यांचा सीबील खराब असल्यामुळे त्यांना बँका दाराजवळही उभे राहू देत नाहीत. कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल हे शिवसेना शिंदे पक्षात तर त्यांच्या भगिनी रश्मी बागल भाजपच्या प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आहेत.
तथापि, कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा थकीत वेतनामुळे सहनशक्तीचा कडेलोट होत आहे. गेल्या १५ दिवसांपासून कर्मचारी मकाई साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करीत आहेत. या प्रश्नावर अध्यक्ष दिग्विजय बागल ज्या पक्षात आहेत, त्याच शिवसेना शिंदे पक्षाचे माढा विभाग जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आवाज उठविला आहे. या पक्षाशी संलग्न शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाखरे, संतोष वारकड, अभिजित शिर्के, सिकंदर मुलाणी यांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत वर्षा बंगल्यासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.