कराड : मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेसंदर्भातील सर्व हरकती फेटाळल्या जाताना, कोणत्याही बदलाविना अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आता आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाकडे इच्छुक उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते व नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

मलकापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे यांनी या सर्व हरकती फेटाळल्या. पुणे विभागीय आयुक्तांनी मान्यता देऊन प्रारूप आराखडाच अंतिम ठरवत अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे निवडणुकीचा पुढील टप्पा असलेल्या आरक्षण सोडतीकडे विशेषतः राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून राहणार आहेत.

मलकापूर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली होती. जाहीर नकाशानुसार ११ प्रभागांतून प्रत्येकी दोन अशी २२ सदस्य संख्या निश्चित होताना, पूर्वीपेक्षा दोन प्रभाग वाढले आहेत. २०११ सालच्या जनगणनेनुसार एकूण ३१ हजार ६७१ लोकसंख्या गृहीत धरली आहे. प्रसिद्ध प्रारूप आराखड्यावर हरकती व सूचना दाखल करण्याच्या मुदतीत सचिन जगताप यांनी संपूर्ण प्रभाग रचनेवरच हरकत दाखल केली होती. तर प्रशांत चांदे, शहाजी पाटील, धनाजी देसाई, अमित महाजन व सतीश चांदे यांनी विशिष्ट प्रभागांवर हरकती घेतल्या होत्या.

मुदतीत एकूण सहा हरकती व सूचना दाखल केल्या होत्या. मुदतीत आलेल्या सहा हरकतींवर चर्चा करून सुनावणी पूर्ण झाली. अधिकारी म्हणून पाटण विभागाचे उपविभागीय तथा प्राधिकृत अधिकारी सोपान टोम्पे यांनी, तर सहायक अधिकारी म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी प्रताप कोळी यांनी काम पाहिले होते. टोम्पे यांनी सर्व हरकती फेटाळून प्रारूप आराखडा ग्राह्य ठरवला आहे.

विभागीय आयुक्त पुणे यांनी त्याला मान्यता देऊन प्रारूप आराखडा अंतिम ठरवला. त्यानुसार अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरम्यान, हरकती व सूचनांचा विचार न करता हा निर्णय घेण्यात आल्याची भावना हरकतदार व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

याबाबत बोलताना, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद-पाटील म्हणाले, मलकापुरातील प्रभागरचनेवर दाखल हरकती फेटाळल्याचा निकाल हरकतदारांना दिला नाही. त्यामुळे हरकतदारांना कोणतीही संधी न देता अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यामुळे संबंधितांकडून लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न झाला आहे.