नांदेड : शहरात खुनाची मालिका सुरूच असून २६ फेब्रुवारी रोजी एका तरुणाची भल्यासकाळी तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेड शहरातील गणेशनगर वाय पॉईंट परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

अण्णाभाऊ साठे चौक परिसरातील खोब्रागडेनगर-२ येथील रहिवासी अमोल भुजबळे उर्फ एमजे (वय ४२) हा दुचाकीवरून (एम.एच.२६, बी.आर.१३८३) बुधवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गणेशनगर मार्गावरून जात होता. सदर दुचाकी गणेशनगर वाय पॉईंट जवळ आली असता अमोल हा एका दुकानासमोर थांबला. त्याचवेळी पाठीमागून धावत आलेल्या दोघांनी त्याच्या पाठीवर व इतर ठिकाणी तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याने अमोल भुजबळे हा रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळून गतप्राण झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खुनाची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, स्थागुशाचे पो.नि.उदय खंडेराय व पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. सद्यस्थितीत आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून त्यांना लवकरच अटक करू असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.