अहिल्यानगर: आमदार संग्राम जगताप यांना धमकीचा संदेश पाठवणारा अनिस अहमद हनीफ शेख (मूळ रा. चकलंबा, गेवराई, बीड, सध्या रा. छत्रपती संभाजीनगर) याला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रथम दराडे यांनी दिली.
अनिस शेखा मालमोटरचालक आहे. गुगलच्या माध्यमातून त्याने आमदार जगताप यांच्या स्वीय सहायकाचा मोबाइल क्रमांक मिळवला व त्यावर धमकीचा संदेश पाठवल्याचे पोलीस तपासात आढळले आहे. त्याला कोणी हे कृत्य करण्यास कोणी भाग पाडले का याचा तपास सुरू आहे. या आरोपीने एका अनोळखी व्यक्तीच्या अकाउंटवरून दोन अश्लील मेसेज पाठवल्याचाही गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहे.
दोन जुलैला आमदार जगताप यांचे स्वीय सहायक सुहास शिरसाठ यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून धमकीचा संदेश पाठवला गेला होता. त्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध लावला. आमदार जगताप यांनी हिंदुत्वाच्या समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेतल्यानेच त्यांना धमकीचा संदेश पाठवण्यात आल्याचा जगताप समर्थकांचा आक्षेप आहे.