राज्य सरकारने मराठा आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करत ओबीसी समाजात समावेश करण्याची मागणी केली आहे. याला राज्यातील ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांविरोधात उभे राहतील असा निर्णय सरकार घेणार नाही, असं मत व्यक्त केलं. त्यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी (११ सप्टेंबर) जालन्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते. त्याचा उपोषणाचा १४ वा दिवस आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांविरोधात उभे राहतील असा निर्णय देणार नाही, असं म्हटलं. याबाबत विचारलं असता मनोज जरांगे म्हणाले, “ते स्वतःच्या मनानेच मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या अंगावर येईल, वातावरण खराब होईल असं म्हणत आहेत. आमचंही बघा ना, आमच्यावर किती दिवस अन्याय करता.”

“फडणवीस मनानेच अशी वक्तव्ये करत वातावरण दुषित करत आहेत”

“फडणवीस मनानेच अशी वक्तव्ये करत वातावरण दुषित करत आहेत. ते ओबीसी समाज रस्त्यावर येईल, मराठा समाज रस्त्यावर येईल असं म्हणत आहेत. मात्र, दोन्ही समाज रस्त्यावर येणार नाही. उलट असं म्हणून तेच समाजाला रस्त्यावर आणत आहेत अशी शंका यायला लागली आहे. त्यांनी उगाच असं वक्तव्य कशासाठी करायचं,” असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला.

हेही वाचा : “आरक्षणाला वेळ लागेल, तुम्ही ऐकत का नाही?”; मनोज जरांगे म्हणाले, “शिंदे-पवार…”

“एवढ्या मोठ्या माणसाने मनानेच काहीही बोलायला नको”

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “त्यांच्यावर अन्याय करू नका आणि आमच्यावरही अन्याय करू नका. आमच्यावर किती दिवस अन्याय करणार आहेत. एवढ्या मोठ्या माणसाने काहीही बोलायला नको. जाऊ द्या, मला त्यावर काहीच बोलायचं नाही. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, आम्हाला आरक्षण पाहिजे. तेही संपूर्ण महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या.”

हेही वाचा : Video: “मी हात जोडून आवाहन करतो की…”; पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंची मराठा समाजाला साद, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांच्या मनात आमच्याविषयी खोट की प्रेम हे उघडं पडणार”

“तुम्ही आता आमचं भिजत घोंगडं ठेऊ नका. आम्ही सर्व पक्षांना खूप दिलंय. त्यामुळे आता द्यायची वेळ तुमची आहे. तुम्हाला जे करायचं ते करा, पण मराठ्यांना आरक्षण द्या. ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी किती मनापासून काम करतात हे दिसणार आहे. त्यांच्या मनात आमच्याविषयी खोट आहे की प्रेम आहे हे आज उघडं पडणार आहे. आज महाराष्ट्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडे पाहत आहे,” असं म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला.