Manoj Jarange Patil Mumbai Protest: मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील जालन्याहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईत २९ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषणाला बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. यापूर्वीही मनोज जरांगे पाटील मोठ्या संख्येने आंदोलकांना घेऊन मुंबईच्या वेशीपर्यंत आले होते. यंदा गणेशोत्सव असून मुंबईत हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. त्यात विघ्न येऊ नये म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनाला परवागनी दिलेली नाही. तसेच मुंबई पोलिसांनी आज (२७ ऑगस्ट) आंदोलनासाठी काही अटी ठेवल्या आहेत. या अटींवर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी सर्व नियमांचे पालन करणार आहे. माझा समाजही नियमांचे पालन करू. आम्ही हट्टी नाही. पण एक दिवसांचे आंदोलन शक्य नाही. उपोषण बेमदुत असेल. बाकी सर्व नियम आम्ही पाळू. मी नियमांची सूचना अद्याप वाचलेली नाही. ती वाचून मी यावर अधिक भाष्य करेन.
एका दिवसाचे आंदोलन शक्य नाही
“मी २९ ऑगस्टला उपोषणाला बसणार आहे. आमच्या मागण्या मान्य करत असतील तर इथूनच मी माघारी जायला तयार आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्यास तीन लाख ट्रक गुलाल आणण्याचा मी शब्द दिला आहे. एका दिवसात जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर एक दिवसातच आंदोलन मागे घेऊ”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही…
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण करण्यावर मी ठाम आहे. एका दिवसाची अट सोडून इतर सर्व नियम मराठा समाज पाळेल. तसेच आज रात्री शिवनेरी गडावर पोहोचल्यानंतर सविस्तर भूमिका मांडू, असेही ते म्हणाले.
मुंबई पोलिसांनी कोणत्या अटी ठेवल्या?
मुंबईत येण्यावर ठाम असलेल्या मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यांना केवळ एकच दिवस आंदोलन करता येईल, अशी प्रमुख अट ठेवली आहे. याशिवाय मनोज जरांगे यांना आंदोलनस्थळी केवळ पाच वाहने आणण्याची आणि केवळ पाच हजार आंदोलकांसह आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे.