जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी लाठीमार केला होता. या हल्ल्यात अनेक आंदोलक आणि महिला जखमी झाल्या होत्या. याबाबतचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पोलिसांकडून लाठीमार होताना घटनास्थळी नेमकी काय स्थिती होती? याचा घटनाक्रम स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी सांगितला आहे. जरांगे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या शेणी येथे केलेल्या भाषणात मनोज जरांगेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.

नाशिकच्या शेणी येथील भाषणात मनोज जरांगे म्हणाले, “मराठ्यांच्या लेकरांना न्याय देण्यासाठी आंतरवलीत आमचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर काय झालं माहीत नाही, पण तिसऱ्या दिवशी आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आमच्या आया-बहिणींचे डोके फोडण्यात आले. पोरांच्या छातीत गोळ्या घातल्या. आमच्या लेकरांना-पोरांना जर तुम्ही मारलं असतं, तर आम्ही काही केलं नसतं. पण त्या निष्पाप माता-माऊलीनं तुमचं काय केलं होतं? जेणेकरून तुम्ही तिच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या केल्या.”

हेही वाचा- “लाठीमार होताच मनोज जरांगे घरात जाऊन झोपले”; भुजबळांच्या टीकेला रोहित पवारांचं उत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमचं आंदोलन शांततेत आणि कायद्याच्या आधीन राहून चालू होतं. त्यामुळे यात महिलाही प्रचंड संख्येनं सहभागी झाल्या होत्या. एक माऊली चार महिन्यांचं लेकरू मांडीवर घेऊन आंदोलनात बसली होती. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर आईचं डोकं फुटलं आणि तिचं रक्त बाळाच्या अंगावर पडायला लागलं. एका एका माऊलीला ३०-३०, ४०-४० टाके पडले. चार पाच दिवसांनी आपली आई-बहीण शुद्धीवर आली. यानंतर मला फोन यायला लागले, दादा आता आपलं रक्त सांडलंय. आता मागे हटायचं नाही. काय व्हायचं ते होऊ द्या. पण आरक्षण मिळवायचं. ते आंदोलन आजही शांततेत सुरू आहे. आमच्यावर हल्ला का केला गेला? याचं उत्तर आजही सरकारला देता आलं नाही,” असंही मनोज जरांगे म्हणाले.