बीडमधील जाळपोळ प्रकरणात संबंध नसलेल्या मराठा समाजातील तरूणांना अटक केली जात आहे. सत्तेचा गैरवापर गोरगरिब तरूणांवर करू नका. अन्यथा बीड आणि महाराष्ट्रातील समाज शांत बसणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी दिवाळीनिमित्त जरांगे-पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यानंतर जरांगे-पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“बीडमधील जाळपोळ प्रकरणात संबंध नसलेल्या तरूणांना अटक करण्यात येत आहे. सात हजार लोकांची यादी काढल्याची माहिती मिळाली आहे. मराठ्यांच्या मुलांवर अन्याय करू नका. कितीही दबाव टाकला, खोटे गुन्हे दाखल केले तरी आंदोलन मोडीत निघणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही घाबरणार आणि खचणारही नाही,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा : मराठा आरक्षण मिळणार कसे?
“लक्ष्य करून जातीवाद निर्माण केला जातोय”
“बीड, नांदेड, कुर्डूवाडी, परभणी, हिंगोली, लातूर येथील तरूणांना अटक केली जात आहे. त्याबाबत चिवटे यांना माहिती दिली. साखळी उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. लक्ष्य करून जातीवाद निर्माण केला जातोय. घटनात्मक पदावर असलेल्या ओबीसी नेत्यांनी विनाकारण मराठा समाजातील तरूणांना अटक करण्याचे निर्देश दिलेत,” असा आरोपाही जरांगे-पाटलांनी केला.
हेही वाचा : मराठा आरक्षण न्यायालयात का टिकले नाही? जाणून घ्या…
“आमच्यावरील अन्याय मोडीत काढू”
“सत्तेचा गैरवापर गोरगरिबांच्या मुलांवर करू नका. अन्यथा बीड जिल्ह्यातील सर्व समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण, आमच्यावर अन्याय होत असेल, तर बीड आणि महाराष्ट्रातील समाज शांत बसणार नाही. आम्ही शांततेत आंदोलन करणार, पण आमच्यावरील अन्याय मोडीत काढू,” असा इशाराही जरांगे-पाटलांनी सरकारला दिला.