मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत मग आरक्षण घेणारच. आम्ही सरसकट आरक्षणच घेणार अशी घोषणा आज मनोज जरांगे पाटील यांनी जळगावातून पुन्हा एकदा केली. आमच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न करु नका ही तुम्हाला विनंती आहेत. आमच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत. तरीही आरक्षण दिलं नाहीत तर गाठ आमच्याशी आहे हा तुम्हाला जाहीर इशारा आहे असंही मनोज जरांगे पाटील सरकारला उद्देशून म्हणाले आहेत.

गिरीश महाजन यांना केला सवाल

“मी तुमच्याशी खरं बोलतो आहे. आमदार झाल्यावर काही लोक जात पाहू लागले आहेत. आम्ही जात पाहिली नाही. तरीही काहीजण आपला अपप्रचार केला जातो आहे. आम्हाला सांगण्यात आलं होतं कुणाला अटक होणार नाही आणि गुन्हे मागे घेतले जातील. गिरीश महाजन यांना माझा सवाल आहे की अजून गुन्हे मागे का घेतले नाही? आमचे लोक का अटक केले? शब्द फिरवायचा असेल तर गाठ आमच्याशी आहे” असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख

“आम्हाला शांतता ठेवायची आहे. सरकारलाही विनंती करतो आहे की बोलल्याप्रमाणे सगळे गुन्हे मागे घ्या, कार्यकर्त्यांची अटक थांबवा. जे दोषी आहेत त्यांचं समर्थन आम्ही करणार नाही पण निष्पाप लोकांना गुंतवलं जातं आहे ते थांबलं पाहिजे. एकट्या छगन भुजबळचं ऐकून आमच्यावर कारवाई झाली तर सरकारला त्याचे परीणाम भोगावे लागतील. तुम्ही त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा. मराठ्याच्या दारातही उभे राहू नका. २४ डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण देण्याचं आपलं ठरलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तातडीने लेखी देऊन २४ तारखेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या. त्याच्या (छगन भुजबळ) सुरात सूर मिसळू नका. तुम्ही त्याचं ऐकून, दबावाखाली येऊन अन्याय केला तर ५५ टक्के मराठे आहेत हे विसरु नका” असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मायबाप बांधवांना विनंती आहे. ज्यांना आरक्षण मिळालं आहे आणि ज्यांना मिळालं नाही असे सगळे जण एकत्र या. गोर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळण्याची हीच वेळ आहे. सगळ्यांनी एकत्र या. माझा जीवही गेला तरीही मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. असंही जरांगे पाटील म्हणाले.