मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचा मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आज २६ जानेवारी रोजी त्यांनी वाशी येथे भव्य जाहीर सभा घेऊन आज नवी मुंबईतच थांबणार असल्याचा निर्धार केला. मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेल्या सुधारणा केल्यास गुलाल घेऊन मुंबईत येऊ अन्यथा आंदोलनाकरता येऊ, असा इशारा पाटलांनी आज दिला. दरम्यान, मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाल्याने कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेतल्याचं माध्यमांतून सांगण्यात येतंय. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला.
मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. परंतु, तरीही ते मुंबईत येणार असल्याच्या निर्णयावर ठाम आहेत. याबाबत ते म्हणाले, आम्ही सांगितलेल्या सुधारणांचा अध्यादेश येणार की नाही ही जर-तरची गोष्ट आहे. अध्यादेश आला तरी आम्ही गुलाल घेऊन मुंबईत येणार आहोत. आणि अध्यादेश नाही आला तरी आम्ही मुंबईत येणार आहोत, असं मनोज जरांगे म्हणाले. परंतु, या काळात आम्ही मुंबई पोलिसांना सहकार्य करणार आहोत. अध्यादेश आला तर आम्ही त्यांचा मान-सन्मान करू. आनंदाच्या भरात आम्ही मुंबई पोलिसांना मान-सन्मान करू असंही पाटील म्हणाले.
हेही वाचा >> Manoj Jarange speech : ..तर गुलाल उधळायला आझाद मैदानात येणार, भाषणातले दहा महत्त्वाचे मुद्दे
दरम्यान, मुंबई आणि आजूबाजूच्या शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने काही मराठा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. याबाबत जरांगे म्हणाले, सरकार आणि गृहविभागाकडून गैरसमज पसरता कामा नये. मराठा समाजातील बांधवांपैकी कोणीही काहीही करत नाहीत. ते शांततेत मुंबईत आले आहेत. त्यांना मुंबईच्या गल्ल्या माहित नाहीत. त्यामुळे कोणी कुठे चुकून शिरल्यामुळे ट्राफिक जाम होत असेल. त्याचा अर्थ असा नाही की काही वाईट घटना करायच्या आहेत. मराठा बांधवांना अटक केली असेल तर सोडून द्यावं. ट्राफिक जाम झाली असेल हे मी मान्य करतो. पण त्यांना मुंबईतील रस्ते माहित नाहीत. जाणूनबुजून काही होणार नाही. पोलीसांनी त्यांना साथ द्यावी. तातडीने त्यांना सोडून द्यावं, असं मनोज जरांगे म्हणाले.