मराठवाडय़ातील गारपिटीचा परिणाम म्हणून औरंगाबाद जिल्ह्य़ातही सोमवारी रात्री उशिरा जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट झाल्याचेही वृत्त आहे. पण त्याचे प्रमाण मराठवाडय़ातील इतर तालुक्यांएवढे नव्हते. औरंगाबाद शहरात मात्र जोरदार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटांसह झालेल्या पावसामुळे अनेक भागांत वीज गायब होती. रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत झाला. मंगळवारी दिवसभर हवेत कमालीचा गारवा होता.
औरंगाबाद शहरात व अन्य तालुक्यांतही पावसाच्या रिमझिम सरी येत होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते. स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी कमालीचा गारठा असल्याने स्वेटर बाहेर काढावे लागले. गारपिटीचे पंचनामे गावोगावी होत असल्याने त्याच्या एकत्रीकरणाचे काम विभागीय आयुक्तालयात सुरू होते. तथापि, किती गावांत गारपीट झाली, याची माहिती प्रशासनाला मिळू शकली नाही.
साखर भिजल्याने ‘वैद्यनाथ’ला २० कोटींना फटका
दुष्काळाने मारलं, गारपिटीने झोडलं!
वार्ताहर, बीड
जिल्ह्य़ात सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या गारपिटीमुळे हजारो हेक्टर शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, ज्वारी पिकांनी अक्षरश: जमिनीवर लोळण घेतली. काही ठिकाणी पिकांवर बर्फ साचला. फळबागांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. वीज पडून एक जण ठार तर तिघे जखमी झाले. काही गावांमध्ये जनावरे दगावली. परळी तालुक्यातील १५ गावांमध्ये मोठा फटका बसला, तर वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गोदामात पाणी शिरल्याने २० कोटींचे नुकसान झाले. जवळपास ६० हजार पोती साखर भिजली. जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.आष्टी तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे संत्रा, मोसंबीचे नुकसान झाले. फळबागा भुईसपाट झाल्या. द्राक्ष, डाळिंबाच्या बागांनाही गारपिटीचा तडाखा बसला. केज तालुक्यातील मस्साजोग परिसरातील अनेक द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. वडवणी तालुक्यातील चिंचवण, िपपरखेडसह इतर गावांतही गारपीट झाली. िपपरखेड येथे वीज पडून सत्यभामा कानडे ही महिला ठार झाली, तर अर्जुन एकाळ, कस्तुरबाई एकाळ व आश्रुबाई गायकवाड हे तिघे गंभीर जखमी झाले. अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. जि.प.चे कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी धारूर व अंबाजोगाईस भेट देऊन गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. गारपिटीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची माहिती गोळा केली जात असून सर्व तहसीलदारांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अंदाजे सात ते आठ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले असावे, अशी माहिती मुळे यांनी दिली.
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केली. हेक्टरी ४० हजार रुपये मदत व्हावी, असा नियम आहे. तो बदलून झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई द्यावी, या साठी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. २४ तासांत मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
पावसाने पुन्हा झोडपले
गारांच्या तडाख्यात रब्बी पिके उद्ध्वस्त
वार्ताहर, परभणी</em>
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मानवत, सेलू, सोनपेठ, पाथरी तालुक्यांत गारपिटीने रब्बी पिकांसह फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सोनपेठमध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या गारांच्या आच्छादनाने शिवारे पांढरी झाली. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सर्वच तालुक्यांतून होत आहे.
सततच्या गारपिटीने जिल्ह्यात कहर केला आहे. अवकाळी पाऊस, सोबत गारांचा मारा यामुळे पिकांची दाणादाण उडाली. जिल्ह्याच्या सर्वच भागांत गारांच्या पावसाने पिके जमीनदोस्त झाली. दरम्यान, मंगळवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने आता पीक हाती येण्याच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या आहेत. मागील आठवडाभरापासून जिल्हाभर गारपीट सुरू आहे. या वर्षी मुबलक पाणी असल्याने जिल्हाभर गव्हाचा पेरा वाढला. गहूपीक काढणीला आले असतानाच पावसाने हाहाकार उडविला. गव्हासोबतच ज्वारीची काढणी अनेक ठिकाणी सुरू आहे. वारा व पावसाने ज्वारी, गव्हाचे पीक आडवे झाले. कापून टाकलेली ज्वारी मातीत मिसळली. या दोन्ही पिकांबरोबर जिल्ह्यातील फळबागाही मोडून पडल्या. सोनपेठ परिसरात अर्धा तास गारांचा पाऊस झाला. िलबाच्या आकाराएवढय़ा गारा पडल्याने पिकांसोबत मोठय़ा झाडांची पानेही शिल्लक राहिली नाहीत. सोनपेठमध्ये पडलेल्या गारांपेक्षा गवळी िपप्री येथे डिघोळ दरम्यान गारांचा वर्षांत अधिक होता. या भागातील शिवार गारांमुळे पांढरेशुभ्र झाले होते. गारांच्या आच्छादनामुळे या भागास काश्मीरचे स्वरूप प्राप्त झाले होते. सेलू तालुक्यातील डिग्रस जहागीर, ढेंगळी िपपळगाव, धनेगाव व वालूर भागात पाव किलोच्या वजनाएवढय़ा गारा पडल्या. पाथरी तालुक्यातील मुद्गल, वाघाळा, वंजारवाडी भागातही गारपीट झाली. सेलू, पाथरी, सोनपेठ व मानवत तालुक्यांतील शिवारे पांढरीशुभ्र झाली.
मंगळवारी पहाटे जिल्हाभर पावसाने हाहाकार उडवला. जिल्ह्याच्या सर्वच भागांत हा पाऊस झाला.
अवकाळीत दुसऱ्यांदा गारपीट
लातुरात १५ हजार हेक्टर पिके बाधित
वार्ताहर, लातूर</em>
जिल्ह्य़ात अवकाळी पावसाने शेतातील पिकांना चांगलाच तडाखा दिला. प्रामुख्याने सोमवारी संध्याकाळी गारपिटीने विविध तालुक्यांत रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपिटीच्या तडाख्यात किमान १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके नेस्तनाबूत झाल्याचा अंदाज आहे. सुमारे एक हजार कोटीपेक्षा अधिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या २३ फेब्रुवारीपासून जिल्हय़ात पावसाचे आगमन झाले. पावसाळय़ाप्रमाणे रोजच पाऊस पडत आहे. पाच दिवसांपूर्वी जिल्हय़ात गारपीट झाल्यामुळे ३ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले. महसूल व कृषीचे अधिकारी पंचनाम्यासाठी फिरत होते. त्यांचा अहवाल येण्याआधीच सोमवारी सायंकाळी पुन्हा गारपिटीचा मारा सुरू झाला. सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत औसा, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर आदी तालुक्यातील गावांना गारपिटीचा तडाखा बसला. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास पुन्हा पावसाने उचल खाल्ली. त्यात शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले.
औसा तालुक्यातील भादा, निलंगा तालुक्यातील निटूर, पानचिंचोली, ताजपूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड या गावात पावसाचा मोठा फटका बसला. औसा तालुक्यातील भादा गावात तब्बल ६५ मिमी, उजेड ६० मिमी, निटूर ५६ मिमी, तर पानचिंचोली ४५ मिमी पाऊस झाला आहे. निटूर परिसरात गारांचा सुमारे १ फूट खच पडला होता. पाहावे तिकडे गाराच गारा असे चित्र होते. रब्बीची सर्वच पिके पूर्ण हातची गेली. हरभरा, गहू व ज्वारी ही पिकेही जमीनदोस्त झाली. आंबा, द्राक्ष, डाळिंब यांच्या बागा पूर्ण कोलमडून पडल्या. हरभरा काढून राशीसाठी घातलेल्या गंजीही भिजल्या.
लातूर तालुक्यात वीज पडून दोन जनावरे दगावली. टाकळी, बोरी, मुशिराबाद, पेठ, आदी परिसरातील सुमारे १ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. मंगळवारीही सकाळपासूनच आकाशात ढगांनी गर्दी केली. दुपारी बाराच्या सुमारास निटूर व ताजपूर परिसरात पाऊस सुरू झाला. पावसामुळे अनेक गावांत घरांच्या िभती पडल्या. घरावरील पत्रे उडाले. रानावर पसरलेल्या हरभरा, करडय़ाच्या पेंडय़ा रानोमाळ झाल्या. निटूर परिसरातील सुमारे २ हजार हेक्टरवरील ९० टक्के पिके भुईसपाट झाली. २५ गावांत तर आता पाहण्यासाठीही पीक शिल्लक नाही. मसलगा गावातील शेतकरी बाबासाहेब पाटील यांच्या शेतातील एक एकर टरबूज, दोन एकर टोमॅटो, दोन एकर केळी व दोन एकर पपईची बाग हे संपूर्ण क्षेत्र पूर्ण नेस्तनाबूत झाले. त्यामुळे या शेतकऱ्याचा धीरच खचला आहे.
जळकोट तालुक्यातील वांजरवाडा परिसर, औसा तालुक्यातील भादा, औसा व किनी या महसूल विभागात सुमारे ९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जिल्हय़ातील बाधित गावांची पाहणी करून नुकसानीचे अहवाल तयार करण्यास किमान ४ दिवस लागतील, असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले.
नुकसानभरपाईची मागणी
जिल्हय़ात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. किसानसभेच्या वतीनेही अशीच मागणी करण्यात आली.