स्वानंद पाटील, लोकसत्ता

बीड : मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्माण झालेला रोष, त्यातून उभे राहिलेले संघटन, संतोष देशमुख यांचे भाजपचे सरपंच असणे या सर्वांचा विचार करून त्यांच्या कार्यकाळातील जलसंधारणाच्या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याला मस्साजोगच्या प्रभारी सरपंच वर्षा सोनवणे यांनी उपस्थित रहावे, यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणासाठी जिल्हास्तरावरून कोणताही प्रस्ताव पाठविण्यात आला नव्हता. थेट केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांच्या मार्फत निमंत्रण देण्यात आले.

दिल्लीत होणाऱ्या चार दिवसीय सोहळ्यासाठी सरपंच सोनवणे आणि त्यांचे पती उपस्थित राहणार आहेत. बुधवारी त्या विमानाने दिल्लीत पोहचल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पवनऊर्जा क्षेत्रातील उद्योजकांना तसेच भाजपच्या सर्वसामान्यांना त्रास झाला तर सरकार त्यांच्या पाठिशी उभे राहील, असा संदेश या निमंत्रणामागे असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी कार्य केले होते. २०१८ मध्ये गावात लोकसहभागातून पाणी फाउंडेशन मार्फत नदी व ओढा खोलीकरण, मातीनाला बांध असे जलसंधारणाची कामे झाली. त्याच कामाची दखल केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून घेतली गेली. हे काम सव्वादोन किलोमीटरचे असल्याचे अधिकारी सांगतात. या आधीही दिवंगत सरपंच संतोष देशमुख हयात असताना गावाला विविध पुरस्कार मिळालेले आहेत. आता दिल्ली येथील स्वातंत्र्य सोहळ्याच्या आमंत्रणाने गावच्या सन्मानात भर पडेल, असा दावा गावकरी करतात.

लोक सहभागातून पाणीदार गाव करण्यासाठी हे कार्य केले गेले. त्याचे फलित म्हणून हा सन्मान मस्साजोग गावाला भेटला आहे. स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील ध्वजारोहणासाठी गावाच्या सरपंचाला निमंत्रण भेटणे हा संपूर्ण गावाचा सन्मान आहे, हे श्रेय सर्व गावाचे आहे. – धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचे बंधू

थेट निमंत्रण कसे ?

मस्साजोगच्या विद्यमान सरपंचांना जलसंधारणाच्या केलेल्या कामासाठी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे थेट दिल्लीतून निमंत्रण दिले गेले. गावात झालेल्या कामासाठी बीड जिल्हा परिषदेकडून कुठलाही प्रस्ताव पाठवण्यात आला नव्हता. जलशक्ती मंत्रालयाकडूनच मस्साजोगची निवड करण्यात आली. उपसरपंच वर्षा सोनवणे या बुधवारी रात्रीच विमानाने दिल्लीत पोहोचल्या.

‘‘मस्साजोगच्या प्रभारी सरपंच वर्षा सोनवणे यांना दिल्लीतील सोहळ्याला निमंत्रित करण्यात आले, ही जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब का साथ, सब का विकास’ हेच ध्येय ठेवून काम सुरू ठेवले आहे. परंतु, काही लोक जाणीवपूर्वक पक्षाबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम करतात. संतोष देशमुख हे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते होते. बुथप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांचे जलसंधारणासह विकासात्मक कार्यही दखल घेण्यासारखेच आहे. – शंकर देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप.