पंढरपूर : पुणे जिल्हा आणि उजनी धरण लाभक्षेत्रात सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी धरणातून ९१ हजार ६०० क्युसेक तर वीर धरणातून ५४ हजार ७६० क्युसेक असा एकूण १ लाख ४६ हजार ३६० क्युसेक इतका विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भीमा नदी दुथडी भरली आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.

दरम्यान शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी तसेच पूर परिस्थितीत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील रायगड भवन येथे एक हजार नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून जीवनावश्यक वस्तू हलवण्यासाठी नगरपालिकेकडून वाहनांची व्यवस्था करण्यात आल्याचेही रोकडे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. वीर धरणातून बुधवारी सकाळपासून नीरा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यात वाढ होऊन दुपारी ५४ हजार क्युसेक पाणी नीरा नदीला सोडण्यात आले. हे पाणी अकलूज जवळील नीरा आणि भीमा नदीच्या संगम येथे मिळते. तिथून पुढे हे पाणी भीमा नदीला जाते. बुधवारी दुपारी ३ वाजता संगम येथून १ लाख २० हजार ६९५ क्युसेकने पाणी वाहत होते. तर चंद्रभागा नदी पात्रातून ६० हजार २४७ क्युसेकने पाणी वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नगरपालिका प्रशासन सज्ज

उजनी व वीर धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी भीमा नदीला उजनीतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षेबाबत दक्षता घ्यावी तसेच पूर परिस्थितीत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. तसेच नगरपालिका प्रशासनामार्फत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील रायगड भवन येथे एक हजार नागरिकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाधित होणाऱ्या नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू नेण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून. स्थलांतरित करण्यात येणाऱ्या नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व स्वयंसेवी संस्थेमार्फत भोजन व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी रोकडे यांनी सांगितले.