अलिबाग– थंड हवेचे ठिकाण आणि राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गेल्या २४ तासात माथेरानमध्ये ४३८ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोदं झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले असल्याने, माथेरान मध्ये इतर भागाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक असते, मोसमी वाऱ्यांना पर्वतरांगामुळे होणारा प्रतिरोध हे या मागचे प्रमुख कारण असते. हिरव्यागार वनराईने नटलेल्या माथेरान मध्ये गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु होता. मात्र मंगळवारी दिवसभर अतिमुसळधार पाऊस सुरु होता. ज्याचा विपरित परिणाम माथेरान मध्ये पहायला मिळाला.

बुधवारी सकाळी आठ वाजे पर्यंत संपलेल्या २४ तासात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.२४ तासात इथे तब्बल ४३८ इतका विक्रमी पाऊस नोंदवला गेला, महत्वाची बाब त्यापूर्वी च्या २४ तासात माथेरान मध्ये २५४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. म्हणजे दोन दिवसात माथेरान मध्ये जवळपास ७०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अतिवृष्टीमुळे माथेरानमधील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले, माथेरानच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला. माथेरान घाटात भला मोठा दगड रस्त्यावर कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. सुदैवाने यावेळी वाहनांची वर्दळ नव्हती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सतत बरसणाऱ्या पावसामुळे माथेरांनमधील रस्त्यांची मोठी झिज झाली आहे. रस्त्यावरील माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचे पहायला मिळत आहे. माथेरानच्या पायथ्याशी असलेले आणि नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण रात्री शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे रात्रीपासून धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच मोरबे धरण परिसराच्या पाणलोट क्षेत्रात सततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आज बुधवार दिनांक 20/8/2025 रोजी पहाटे 3.10 वाजता मोरबे धरणाचे (12 मी.× 3 मी. आकाराचे ) दोन्ही वक्रकार दरवाजे 25 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून 1123 क्युसेक पाण्याचा विसर्ग धावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे धावरी नदीच्या काठावरील चौक, जांभिवली, आसरे, धारणी, तुपगाव, असरोटी व कोपरी या गावांना तसेच पाताळगंगा नदी तीरावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.या दरम्यान धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढणार असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. असे जाहीर आवाहन तहसीलदार कार्यालय खालापूर आणि नवी मुंबई महानगरपालिके मार्फत स्थानिक नागरिकांना करण्यात येत आहे.