लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी येत्या २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन जाहीर सभा होणार असताना त्याच दिवशी सोलापुरात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे.
सोलापूर आणि माढ्याच्या लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आता बड्या नेत्यांच्याही सभा होत असल्यामुळे रणधुमाळी चांगलीच वाढली आहे. गेल्या २४ एप्रिल रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा सोलापुरात लक्ष्मी मिलच्या मैदानावर झाली होती. या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता महातुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा २९ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता होम मैदानावर आयोजिली आहे. या विस्तीर्ण मैदानावर सुमारे दोन लाखांचा जनसमुदाय उपस्थित राहील, असा विश्वास भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केला आहे. या सभेची जय्यत तयारी होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी कर्णिक नगरातील मैदानावर शिवसेना उद्धव ठाकरे प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची संयुक्त जाहीर सभा आयोजित केली आहे. सायंकाळी ४.३० वाजता होणाऱ्या या संयुक्त सभेची तयारी होत असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा समन्यक, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे व जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी सांगितले.
आणखी वाचा-नांदेड : व्हीव्हीपॅट, इव्हीएम मशिन कुर्हाडीने फोडली
सोलापूर लोकसभा मतदरसंघात महाविकास आघाडीसाठी शरद पवार यांच्या पाच जाहीर सभा होणार आहेत. पहिली सभा मोहोळमध्ये झाली. त्यावेळी भाजपचे स्थानिक नेते संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. दुसरीकडे माढा मतदारसंघात मोडनिंब (ता. माढा), करमाळा, सांगोला आदी तालुक्यात पवार यांच्या सभा झाल्या आहेत. करमाळ्यात त्यांच्या उपस्थितीत तेथील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीची ‘ तुतारी’ हातात घेतली.
दरम्यान, महायुतीकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांच्याही सभेसाठी प्रयत्न होत आहेत. तर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनाही सभेसाठी आमंत्रित करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने चालविला आहे.
