धाराशिव: पंच्याहत्तर वर्षांपूर्वी निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुळजापूर शहरातील घाटशीळच्या पायथ्याला झालेल्या छोटेखानी युध्दात दोन सैनिकांनी वीरगती पत्करली. रझाकारांच्या अनन्वीत अत्याचारातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणार्‍या या दोन शहिद सैनिकांचा पंच्याहत्तर वर्षानंतर सन्मान केला जात आहे. १३ सप्टेंबर रोजी सैन्य दलाचे पथक मानवंदना देवून निजामाच्या गोळीबारात शहिद झालेल्या हरियाणातील जमादार हरिराजसिंह आणि जमादार मांगेराम यांना अभिवादन करणार आहे.

मराठवाड्याच्या मुक्तीसाठी योगदान देणार्‍या ज्ञात-अज्ञात अशा अनेक शूरवीर आणि क्रांतिकारकांचा इतिहास काळाच्या उदरात आजही दडलेला आहे. पंच्याहत्तर वर्षांपूर्वी ‘तीन कॅव्हेलरी रेजिमेंट’च्या दोन जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान देवून निजामाच्या सैन्याचा पराभव केला. तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे या दोन्ही सैनिकांच्या समाधी आजही सुस्थितीत आहेत. मात्र त्याबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख तथा इतिहास संशोधक प्रा. डॉ. सतीश कदम यांनी काळाच्या उदरात नजरेआड पडलेली ही शौर्यगाथा पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आणली आहे.

आणखी वाचा-सांगली : बनावट प्रमाणपत्राद्वारे पोस्टात नोकरी; गुन्हा दाखल

१३ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैन्य सोलापूरमार्गे तुळजापूर शहरातील घाटशीळजवळ असलेल्या खंडोबाच्या माळावर येवून थांबले. सैन्याने तेथे तळ ठोकला. वरच्या बाजूला निजामाचा तोफखाना होता. तो उध्वस्त करून भारतीय जवान घाट चढून वर आले. रझाकारांची पळताभुई थोडी झाली. मात्र अचानक निजामाच्या सैनिकांनी गोळीबार केला. त्यात जमादार हरिराजसिंह आणि जमादार मांगेराम यांना वीरमरण आले. १३ सप्टेंबर १९४८ रोजी घडलेल्या या युध्दाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने समाधी परिसराचे नुतनीकरण करण्यात आले आहे. दोन्ही शहिदांचे वारस सैन्यदलातच आहेत. तेही आता सेवानिवृत्त झाले आहेत. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता बारा सैनिकांची एक तुकडी शहिद सैनिकांच्या नातेवाईकांसह तुळजापूर येथे दाखल होत आहे. ७५ वर्षांनंतर मराठवाड्याच्या मुक्तीसाठी बलिदान देणार्‍या सैनिकांना लष्करी मानवंदना देवून अभिवादन केले जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

आणखी वाचा-सांगली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सहा हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहिदांच्या वारसांची असणार उपस्थिती

शहिद मांगेराम यांचे नातू सुनील मलहान नौदलातून सेवानिवृत्त झाले आहेत. तर शहिद हरिराजसिंह यांचे पुत्र निवृत्त कर्नल वीरेंद्रसिंह यांच्याशीही संपर्क करण्यात आला आहे. १३ सप्टेंबर रोजी सकाळी हे दोघेही त्यांच्या नातेवाईकांसह मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. त्याशिवाय सैन्यदलातील बारा जणांचे पथक शहिदांना लष्करी मानवंदना देण्यासाठी दाखल होणार आहे. या पथकात १० जवान आणि दोन कर्नल दर्जाचे अधिकारी असल्याची माहिती इतिहास संशोधक प्रा. डॉ. सतीश कदम यांनी दिली.