सूर्या उजवा तीर कालव्यातून पाणी चोरी; कारखानदाराला ३६ कोटी रुपयांचा दंड; मात्र वर्षांकाठी लाखाचीच वसुली
हेमेंद्र पाटील, बोईसर
पालघर जिल्ह्य़ासह संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना पालघरमध्ये लाखो एमएलडी पाणी कारखानदारांच्या पाटाकडे वळविले जात असल्याचे उघड झाले आहे. सूर्या उजवा तीर कालव्यातून येणारे पाणी हे शेतकऱ्यांना सिंचनासाठी असलेल्या पाण्याचा वापर कारखानदारांसाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे.
पालघर जिल्ह्य़ात सूर्या उजवा आणि डावा कालवा मिळून १४ हजार ६९६ हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. मात्र अनेक ठिकाणी असलेले नादुरुस्त पाट आणि पाटावर झालेली अतिक्रमणे यामुळे फक्त सहा हजार क्षेत्र सिंचनाखाली आजवर आले आहे. कवडास आणि धामनी धरणातून सूर्या उजवा तीर कालव्यात सोडण्यात येणारे पाणी हे सूर्या उजवा तीर कालव्याच्या शाखा कालव्यातून ३६ किलोमीटर लांब असलेल्या पालघर तालुक्यातील कल्लालेपर्यंत पूर्वी जात असे, परंतु नादुरुस्त पाट आणि अनेक ठिकाणी बंद झालेले मार्ग यामुळे अर्ध्यावरच पाण्याचा निचरा होतो. बोईसर-चिल्हार रस्त्यांच्या खालून जाणारा या पाटाचे पाणी या रस्त्याच्या अगोदर असलेल्या गावांना उपयोग होतो. परंतु रस्ता ओलांडून येणारे पाणी हे फक्त कारखान्यासाठी सोडले जात असल्याचे उघड झाले आहे.
बोईसर-चिल्हार रस्त्यावर १९ किलोमीटर अंतरावर सूर्या उजवा तीर कालव्याचा लघुपाट रस्त्याखालून जातो. या पाटाच्या पाण्यामुळे दोन हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत असले तरी येथील विराज प्रोफाइल कारखानदारांच्या मागील बाजूस जाणारा पाट हा नादुरुस्त असल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होते.
याचा फायदा घेत कारखानदाराने याठिकाणी कृत्रिम तलाव खोदून पाणी स्वत:कडे वळवले आहे. तलावात पंप लावून रोज लाखो लिटर पाण्याचा बेकायदापणे उपसा केला जातो. कारखान्यांच्या पुढे पाट नादुरुस्त आणि पुढे पाणी जात नसताना पाटाचे पाणी बोईसर-चिल्हार रस्त्यांच्या पुढे सोडण्याची गरज नसतानादेखील पाटबंधारे विभागाने फक्त कारखानदारासाठीच पाणी सोडत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत.
कारखानदाराने बेकायदा पाण्याचा उपयोग केला म्हणून काही वर्षांपूर्वी कोकण पाटबंधारे विभागाने कारखानदाराला सुमारे ३६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र या दंडाची रक्कम पाटबंधारे विभाग वर्षांकाठी एक लाख रुपये अशी स्वरूपात वसुली करतो.
पाटबंधारे विभाग कारखान्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पाणीपुरवठा कालव्यातून देऊ शकत नाही. असे असताना पाण्याची चोरी होते या नावाखाली अतिशय कमी रकमेची दंडाची वसुली करून लाखो एमएलडी पाण्याचा सिंचनाच्या नावाखाली वाया घालवून कारखानदारांना पाण्याची चोरी करण्यासाठी मोकळीक दिली जात आहे. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील विहिरी, कूपनलिका, तलावे कोरडी झाली असली तर पाटबंधारे विभागाने कारखानदारांचे तलाव मात्र मेअखेरच्या काळातदेखील तुडुंब भरलेले दिसते, मात्र या साऱ्या परिस्थितीकडे सरकारी यंत्रणांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
दुर्गम भाग कोरडाच
बोईसर चिल्हार मुख्य रस्त्यावर सूर्या पाटबंधारे विभागाचे पाटाचे पाणी नादुरुस्त पाटामुळे वाहून जात आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बांधलेल्या पावसाळी पाणी निचरा होणाऱ्या गटारातून हे पाटाचे निघाणारे पाणी या भागातून सुमारे दोन किलोमीटपर्यंत वाहून वाया जात आहे. असे असले तरी याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष पाहावयास मिळत आहे. पालघर जिल्ह्य़ातील जव्हार आणि मोखाडा या भागात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाई आहे. येथील विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत. याठिकाणी टँकरने पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दुष्काळी स्थिती असताना पाटबंधारे विभाग लाखो एमएलडी पाणी नादुरुस्त कालवे यामुळे वाया घालवत आहे. मात्र हे पाणी या दुर्गम भागाला वळविण्यासाठी प्रशासन अपयशी ठरले आहे.
विराज कारखान्याजवळ पाट गळती होत असल्याने त्याठिकाणी पाण्याचा वापर कारखानदाराने केल्याने त्यांनी वापरलेल्या पाण्याचा दंड आकारण्याच्या सूचना क्षेत्रीय स्तरावर केल्या होत्या.
-नीलेश दुसाने, कार्यकारी अभियंता, सूर्या पाटबंधारे विभाग