सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विचारला आहे. पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. मराठवाडय़ातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली जावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी सोमवारी उपोषणाच्या समारोपप्रसंगी केली.

पंकजा मुंडे यांच्या उपोषणावर टीका करताना इम्तियाज जलील यांनी म्हटलं की, “पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात जेव्हा आपल्या हातात सत्ता होती तेव्हा काय गोट्या खेळत होता का ?त्यावेळी या गंभीर प्रश्नासाठी तुम्ही काही केलं नाही. मग आता कशाला नौटंकी करता”.

“सत्ता होती तेव्हा काही केलं नाही आणि आता तुम्ही औरंगाबादमध्ये एकत्र आले आहात. आम्ही काय इतके मूर्ख नाही. जनता मूर्ख नाही. मी विरोधी पक्षात असूनही हे प्रश्न विचारत आहे. जेव्हा सत्ता होती तेव्हा का नाही केलं आणि आता सत्ता गेल्यावर हे नाटक आणि नौटंकी कशासाठी हा प्रश्न तुमचे जे समर्थक आहेत तेदेखील विचारतील,” असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

जलयुक्त शिवार योजना कायमस्वरुपी सुरू ठेवावी, वॉटर ग्रीड योजनेला चालना द्यावी तसेच समुद्रात वाहून जाणारे पाणी विविध नद्याजोड प्रकल्पातून मराठवाडय़ास उपलब्ध करून द्यावे, आदी मागण्यांचे निवेदन भाजपच्यावतीने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना उपोषणानंतर सुपूर्द करण्यात आले. सकाळी ११च्या सुमारास पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास सुरुवात झाली. भाजपच्या बहुतांश नेत्यांनी उपोषणस्थळी हजेरी लावली. पाणी विषयात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही या उपोषणाला पाठिंबा दिला. या वेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हे उपोषण सरकारवर टीका करण्यासाठी किंवा आक्षेप घेण्यासाठी नाही, तर सरकारला वेळीच जाग आणण्यासाठीचे आहे. संवेदनशील मुख्यमंत्री या आंदोलनाची दखल घेतील. मराठवाडय़ाच्या मागासपणाचा प्रश्न पाण्याशी संबंधित आहे. तो सोडविण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.