Ladki Bahin Yojana Update: दोन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी कर्जाबाबत घोषणा केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुजोराही दिला होता. पण दोन महिन्यांत महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरेंनी अशी कोणतीही योजना सध्या सरकारच्या अजेंड्यावर नसल्याचं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आदिती तटकरेंनी दिलेल्या लेखी उत्तरात हे सांगितलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी केलेल्या घोषणेचं काय झालं? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अजित पवारांनी काय केली होती घोषणा?

या वर्षी मे महिन्यात उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुखेडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना लाभार्थी महिलांना कर्ज पुरवठा करण्याबाबत अजित पवारांनी घोषणा केली होती. ही कर्ज पुरवण्यासाठी सरकार सहकारी बँका व इतर स्थानिक बँकांसोबत भागीदारी करण्याचा विचार सरकार करत असल्याचं अजित पवार म्हणाले होते. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

“जिल्हा सहकारी बँका माझ्या बहिणींना ३० ते ४० हजारांचं कर्ज देऊ शकतात. हे रक्कम त्यांना छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठीचं भांडवल म्हणून कामी येईल. नंतर या महिलांच्या खात्यात या कर्जाचे हप्ते चुकते करण्यासाठी १५०० रुपये प्रतिमहिना जमा केले जातील”, असं अजित पवार म्हणाले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही “लाभार्थी महिलांना मिळणाऱ्या या आर्थिक मदतीतून त्यांना अधिकाधिक फायदा होईल यासाठी राज्य सरकार काम करत आहे. ही योजना कार्यक्षमपणे राबवली जाईल”, असं म्हटलं होतं.

आदिती तटकरेंचं विधानसभेतील उत्तर

दरम्यान, अजित पवारांनी जाहीर केलेल्या या योजनेसंदर्भात विधानसभेत विचारणा केली असता आदिती तटकरे यांनी त्यावर नकारात्मक उत्तर दिलं. अशी कोणतीही योजना सध्या सरकारच्या अजेंड्यावर नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाल्या आदिती तटकरे?

आदिती तटकरेंनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेबाबत निवेदन सादर करताना यासंदर्भातली आकडेवारी दिली. “लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना १५०० रुपयांचा लाभ मिळावा यासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य गटातील लाभार्थ्यांसाठी २८ हजार २९० कोटी, अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ३२४० कोटी आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमधील लाभार्थ्यांसाठी ३९६० कोटींची तरतूद केली आहे. त्यानुसार निधी वितरीत करण्यात आला आहे”, असं तटकरेंनी आपल्या उत्तरात सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हप्ता २१०० करण्याबाबत कोणताही उल्लेख नाही!

दरम्यान, आपल्या उत्तरात लाडकी बहीण योजनेसाठी दिला जाणारा हप्ता १५०० वरून २१०० करण्याबाबत कोणताही उल्लेख मंत्री आदिती तटकरे यांनी केला नाही. त्यामुळे महायुती सरकार सत्तेत येताना दिलेल्या आश्वासनाचं काय झालं? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याशिवाय, २२८९ सरकारी कर्माचारी महिलाही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये होत्या, ही बाब आदिती तटकरेंनी विधानसभेत मान्य केली आहे. या महिलांना योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.