अलिबाग : मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई आणि पुण्याला जवळ आणण्याचे काम होणार आहे. सहा किलोमीटरने अंतर कमी होणार आहेच, पण प्रवासाचा वेळ अर्ध्यातासाने कमी होणार आहे. बोर घाटात सध्या जी वाहतूक कोंडी होते तो घाटाचा भाग प्रवासातून निघुन जाणार आहे. त्यामुळे विना अडथळा प्रवास होऊ शकेल असा विश्वास मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मिसिंग लिंक प्रकल्पाची पहाणी केल्यानंतर ते खोपोली येथे माध्यमांशी बोलत होते. प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले. २०१९ या प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले होते. चार वेळा या कामाला मुदतवाढ देण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, मनिषा म्हैसकर आणि एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाच्या पाहाणी नंतर मुख्यंमंत्र्यांनी आजवर झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र काम लवकर पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले. या मार्गावर देशातला सर्वात लांब नऊ किलोमीटरचा बोगदा या मार्गावर होत आहे. ज्याची रुंदी साडे तेवीस मीटर रुंद असणार आहे. समृध्दी महामार्गावरील बोगद्या पेक्षा हा मोठा बोगदा असणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मिसिंग लिंक प्रकल्पात अतिशय उंच केबल स्ट्रे ब्रिज उभारला जात आहेत. ज्याची उंची ही १८५ मीटर असणार आहे. देशातला सर्वात केबल स्ट्रे पध्दतीचा उंच पूल असणार आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पध्दतीने हे काम सुरु आहे. प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता सहा टक्के कामच शिल्लक आहे. मात्र हे का अतिशय जोखमीचे आहे. ताशी ८५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये अभियंत्यांना आणि कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.

पण हे काम लवकर पूर्ण व्हावे अशी आमची अपेक्षा आहे. एमएसआरडीसीने डिसेंबर अखेर पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र हे काम ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरवाती पर्यंत पूर्ण व्हावे असे निर्देश एमएसआरडीसीला दिले असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुंबई पुणे आर्थिक विकास क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यात मिसिंग लिंक हा महत्वाचा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे पुण्यातून एक ते सव्वा तासात नवी मुंबईच्या विमानतळा पर्यंत पोहचणे शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक इंजिनिअरींग मार्वल आम्ही तयार केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही कामे आम्ही करणार आहोत असे जेव्हा सांगायचो तेव्हा अनेकांना वाटायचे नेते घोषणा करतात पण प्रकल्प होत नाहीत. पण ही सगळी कामे आज पूर्ण होतांना दिसत आहेत. एकनाथ शिंदे आणि माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ही कामे सुरु झाली होती आणि आता आमच्या दोघांच्याच कार्यकाळात ही पूर्ण होत आहेत याचा आनंद असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.