शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषदेतील आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना विशेष न्यायाधीश ए. एस. गोसावी यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी दिले.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात आमदार आणि बँकेचे अध्यक्ष अनिल शिवाजीराव भोसले (वय ५५, रा. बाणेर रस्ता), संचालक सूर्याजी पांडुरंग जाधव (वय ६९, रा. कमला नेहरू पार्क, एरंडवणे), मुख्य अधिकारी तानाजी दत्तू पडवळ (वय ५०, रा. तापकीरनगर, काळेवाडी), बँकेचे मुख्य हिशेब तपासणीस शैलेश संपतराव भोसले (वय ४७, नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर) यांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर भोसले यांच्यासह चौघांना सुनावण्यात आलेल्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी लेखापरीक्षक योगेश लकडे (वय ३९, रा. नऱ्हे आंबेगाव) यांनी फिर्याद दिली होती.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींचे बँक खाते, स्थावर जंगम मालमत्तेचा तपास करण्यासाठी आणखी तीन दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. विलास पठारे यांनी युक्तिवादात केली. गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती १५३ कोटी ५० लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. भोसले आणि जाधव यांच्या सांगण्यावरून पडवळ आणि शैलेश भोसले यांनी गैरव्यवहार प्रकरणातील रक्कम बँकेतून काढली. या प्रकरणातील काही रक्कम आणि कागदपत्रे जप्त करायची आहेत, असे अ‍ॅड. पठारे यांनी न्यायालयात सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींच्या वतीने अ‍ॅड. एस. के. जैन, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. बिपीन पाटोळे, अ‍ॅड. ऋषिकेश गानू, अ‍ॅड. शिवम निंबाळकर, अ‍ॅड. विराज पाटोळे, अ‍ॅड. यशपाल पुरोहित यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून भोसले यांच्यासह चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.