शिवप्रतिष्ठान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्यांचं हे विधान वादात आलं असून राजकीय, सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अटकेच्या कारवाईची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी टीव्ही ९ शी बोलताना संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी संभाजी भिडेंवर संतप्त शब्दांत हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले संभाजी भिडे?

अमरावतीच्या बडनेरामध्ये एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार होते, असं विधान केलं. “मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असं संभाजी भिडे म्हणाले होते.

बच्चू कडूंचा हल्लाबोल

दरम्यान, बच्चू कडूंनी संभाजी भिडेंच्या या वक्तव्याचा परखड शब्दांत समाचार घेतला आहे. “या देशात फक्त महात्मा गांधीच नाही, वीर सावरकरांबद्दलही बोललं जातं. राहुल गांधींनी मध्यंतरी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत विधानं केली. आता यांनी महात्मा गांधींबाबत विधानं केली. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन ही विधानं केली जात आहेत. हे चुकीचं आहे”, असं बच्चू कडू यावेळी म्हणाले.

“संभाजी भिडे बोलले ते इतकं…”, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींना भावना अनावर; म्हणाले, “मला खरी चिंता…!”

“आपली औकात तपासली पाहिजे. स्वातंत्र्यामध्ये तुमचं योगदान काय आहे? भिडेजी त्यांच्या वयानुसार स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले असतील. त्यांनी एखादी लाठी स्वातंत्र्यासाठी खाल्लेली नाही. पण महात्मा गांधींबद्दल बोलायला ते विसरले नाहीत. त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत”, अशा शब्दांत बच्चू कडूंनी आपला संताप व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हेच एखाद्या मुस्लिमानं म्हटलं असतं तर…”

“मी शिंदे आणि फडणवीसांना विनंती करणार आहे. त्यांच्याकडूनही अपेक्षा आहेत. तिरंग्याचाही अपमान? कसलं स्वातंत्र्य आणि कसला देश? एवढी हिंमत होते कशी? हेच एखाद्या मुसलमानानं म्हटलं असतं तर तुम्ही लगेच पेटून उठले असते. देशद्रोह म्हटलं असतं. त्याला देशाच्या बाहेर काढण्याची भाषा केली असती. या देशाबद्दल हिंदू वा मुस्लीम,कुणीही बोलत असलं, तरी त्याला तशी शिक्षा दिली पाहिजे. बेड्या ठोकल्या पाहिजेत”, असंही बच्चू कडू म्हणाले.