रत्नागिरी : खेड लोटे औद्योगिक वसाहती मध्ये असलेल्या कंपन्याना कामगार पुरवणा-या ठेकेदाराला मारहाण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव व इतर आठ जणांवर खेड पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लोटे येथील विजय केमिकल कंपनीच्या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी चर्चा करण्यास गेलेले ठेकेदार व शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना विक्रांत भास्कर जाधव व अन्य सात ते आठ जणांनी मारहाण केल्याचे त्क्रारीत नमुद करण्यात आले आहे. फिर्यादी सचिन सुधीर काते (वय ४०, रा. लोटेमाळ, खेड) हे लोटे एमआयडीसी परिसरात गेली दहा वर्षे विविध कंपन्यांना मजूर पुरवण्याचे काम करतात.

२०२१ पासून लोटे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून देखील ते कार्यरत आहेत. दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवासी सचिन कालेकर व रोहन कालेकर यांनी त्यांना विजय केमिकलचे व्यवस्थापक अनंत महाडीक यांनी कामाबाबत बोलावले असल्याची माहिती दिली. त्यानुसार फिर्यादी व अन्य दोन असे तिघेही कंपनीच्या गेटवर पोहोचले. यावेळी व्यवस्थापक महाडीक यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कळवू असे सांगितले. काही वेळानंतर त्यांनी तिघांना कंपनीच्या आत चर्चेसाठी बोलावले. कंपनीच्या आत प्रवेश केल्यावर तेथे विक्रांत भास्कर जाधव (रा. पागनाका, चिपळूण), सुमित शिंदे (रा. धसपटी, चिपळूण), विवेक आंब्रे (रा. आवाशी, खेड) तसेच ७ ते ८ अनोळखी कामगार उपस्थित होते. यावेळी स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीवरून वाद सुरु झाला.

या वादाच्या दरम्यान विक्रांत जाधव यांनी ‘तुम्ही स्थानिक म्हणजे काय?’ असे म्हणत भांडणाला सुरुवात केली. याच दरम्यान विक्रांत जाधव यांनी फिर्यादी सचिन काते यांना हाताने मारहाण केली तसेच जीव घेण्याची धमकी दिली. त्यावेळी सोबत असणाऱ्या सुमित शिंदे, विवेक आंब्रे व अन्य काही कामगारांनीही बेकायदेशीर जमाव जमवून ठेकेदार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन खाते यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेबाबत सचिन काते यांनी खेड पोलीस स्थानकात धाव घेत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार खेड पोलिसांनी विक्रांत भास्कर जाधव, सुमित शिंदे, विवेक आधे यांच्या सात ते आठ जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १८९ (१), १८९(२), १९१(२), ११५(२), ३५२, ३५१ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.