कराड : कराड शहराचा पुनर्विकास दूरदृष्टीने आवश्यक असून, त्यासाठी पुढील २५ वर्षांचा अभ्यास करून नियोजन करावे लागेल आणि त्यासह कराड शहरासाठी वाट्टेल तेवढा निधी खेचून आणू, अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष व आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली. कराडची जडणघडण करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे कराड नगरपालिकेचे निवृत्त अभियंता अशोक पवार यांना भविष्यात आणखी काम करण्याची योग्य संधी दिली जाईल, असे डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.
द कराड आर्किटेक्ट ॲण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे दिला जाणारा सर एम. विश्वेश्वरय्या पुरस्कार कराड पालिकेचे माजी अभियंता अशोक रंगराव तथा ए. आर. पवार यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. आमदार मनोज घोरपडे, स्थापत्य क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंता नितीश बेरी यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. अतुल भोसले म्हणाले, की कराडची विकासकामांच्या माध्यमातून नवीन ओळख निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. शहराच्या विकासासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. पालिकेत आता निवडून येणाऱ्या पदाधिकारी मंडळाशीही समन्वय साधून विकासाला प्राधान्य देणार आहे.
अभियंता संघटनेने पूररेषेसारखे काही महत्त्वाचे प्रश्न मांडलेत. त्यासाठी लवकरच संयुक्त बैठक घेण्यात येईल. शिवाजी क्रीडा संकुल हे ९६ कोटी रुपयांचा निधी मिळालेले जागतिक दर्जाचे क्रीडांगण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, नेकलेस रोडही मंजूर व्हावा म्हणून प्रयत्नशील असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.मनोज घोरपडे म्हणाले, की कराडला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाल्याने शहराच्या वैभवात भर पडणार आहे. नेकलेस रोड झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल. कराडचे शहरीकरण वाढत असून, हा तालुका मोठा असल्याने कराडला अपर जिल्हाधिकारी असावेत, अशी आमची मागणी आहे.
( तर… नव्या कराडची उभारणी शक्य )
सत्काराला उत्तर देताना अशोक पवार म्हणाले, की कराड नगरपालिकेत ३७ वर्षे कायदा व व्यवहाराची सांगड घालून आनंदात काम केले. समस्या निर्माणच होऊ नयेत, ही आपल्या कामाची पद्धत राहिली. अभियंता संघटनेने शहराच्या उभारणीत योगदान देताना, पर्यावरणपूरक विकासासाठी प्रयत्न करावेत. कराडला नेकलेस रोडची आवश्यकता आहेच; पण कोयना नदीवर आणखी पुलाची आवश्यकता असून, त्याचा विचार झाल्यास कराडच्या पश्चिमेला नव्या कराडची उभारणी शक्य आहे. असा विश्वास अशोक पवार यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.