सांगली : काँग्रेस पक्ष कुणाच्या दावणीला बांधलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढविण्याची आमची भूमिका आहे. उमेदवार देत असताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर केला जाईल, असे प्रतिपादन आ. डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
आ. डॉ. कदम यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगाव, विटा, आटपाडी व कवठेमहांकाळ या चार तालुक्यांचा दौरा केला. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार विशाल पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांची निवडणुकीबाबत मते जाणून घेतली. या वेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना डॉ. कदम म्हणाले, स्थानिक पातळीवरील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य व कार्यकर्ते उमेदवारीबाबत निर्णय घेतील. एकदा उमेदवारीबाबत निर्णय झाला की, निवडणुकीत पक्षशिस्त मोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. जिल्ह्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाची ताकद चांगली आहे. अशा वेळी निवडणुकीला सामोरे जाताना आघाडी होत असेल, तर चांगला निकाल मिळू शकतो. महाविकास आघाडी एकसंघपणे या निवडणुका लढवेल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या पावसाचा हाहाकार आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, सध्याचे सरकार असंवेदनशील आहे. सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीची भूमिका घ्यावी. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी विधिमंडळात मी आणि दिल्लीच्या संसदेत खासदार विशाल पाटील पोटतिडकीने भूमिका मांडत आहोत. मात्र सरकार विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रसंगी काँग्रेस रस्त्यावरची लढाई करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला चांगली संधी असून निवडणुकीत लागेल ती मदत करण्याच आम्ही सज्ज आहोत. मात्र, कार्यकर्त्यांनीही काँग्रेसचा विचार घेउन मतदारांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे आवाहन केले. विटा येथे वैभव शिक्षणसंस्थेच्या लॉ कॉलेजच्या सभागृहात आयोजित खानापूर तालुका आणि विटा शहर काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी डॉ. जितेश कदम, मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड, जेष्ठ नेते रवींद्रआण्णा देशमुख, शिवप्रताप मल्टिस्टेटचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, प्रताप सुतार, सुरेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, माजी नगरसेवक सुमित गायकवाड, युवा नेते अजिंयय पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.