कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ महामार्गबाबत विकासाला खो घालणाऱ्या विरोधकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी भरघोस मोबदला दिला जाणार आहे, असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत विरोधकांकडून जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत. हा रस्ता ३०० मीटर रुंदीचा नाही तर १०० मीटर रुंदीचा होणार आहे. पिलरचे पूल केले जाणार असल्याने पुराची तीव्रता वाढण्याचा मुद्दा उद्भवणार नाही. भुदरगड तालुक्यापासून कोकणात बोगद्यातून रस्ता केला जाणार असल्याने पर्यावरणाची हानी होणार नाही.

संवादातून सहमतीचे पाऊल

शक्तिपीठ महामार्गामुळे चांगल्या दळणवळण सुविधा, औद्योगिक, आय.टी. क्षेत्रासह पर्यटन विकास, स्थानिकांना रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे. कोणावरही अन्याय न होता शक्तिपीठ महामार्गासाठी संवादातून सहमतीचे पाऊल उचलले जाणार असल्याची माहिती क्षीरसागर यांनी सांगितले.

भूसंपादनासाठी भरघोस म्हणजे सुमारे पाचपट मोबदला दिला जाणार आहे. याबाबत जमीनधारकांच्या कोणत्याही तक्रारी राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेट्टी, पाटलांवर टीकास्त्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. उलट त्यांच्या शिरोळ तालुक्यातून शक्तिपीठ प्रकल्पासाठी जागा देणारे शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. सतेज पाटील यांच्याकडे विधान परिषदेतील गटनेते, मंत्री, पालकमंत्री असा अनुभव असल्याने शक्तिपीठबाबत माहिती घेऊन बोलावे. सध्या त्यांना काही काम नसल्यामुळे ते अकारण टीका करत आहेत, अशा शब्दांत आमदार क्षीरसागर यांनी या दोन नेत्यांचा समाचार घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शक्तिपीठ महामार्ग समर्थन समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव, माजी महापौर राजू शिंगार्डे, नवनाथ पाटील, अमोल मगदूम, सचिन लंबे, रोहित बाणदार, राम अकोळकर, दत्तात्रय कुलकर्णी, कमलाकर जगदाळे, किशोर घाटगे उपस्थित होते.