लोकसत्ता प्रतिनिधी

अहिल्यानगर : शहरात बांगलादेशी घुसखोर वाढले असून त्यांना सेतू चालकांमार्फत बनावट कागदपत्रे उपलब्ध होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी केला असून आशा सेतू चालकांवर कारवाई करावी व सेतू केंद्रे रद्द करावीत, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

आमदार जगताप यांनी आज, सोमवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. हिंदुत्ववादी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यासंदर्भात माहिती देताना आमदार जगताप यांनी सांगितले, देशात बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली असून महाराष्ट्र व त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्ह्यात खुपच अधिक संख्येने वाढल्याचे दिसते आहे.

पुण्यात स्वारगेट परिसरात एका बांगलादेशीय घूसखोराकडे आधार कार्ड, पॅनकार्डसह मतदान कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना सापडला आहे. मालेगावमध्ये एका घूसखोरास बनावट जन्म दाखला दिल्याने तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तसेच अहिल्यानगर शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा सेतू चालकांमार्फत नकली शिक्के, बनावट आधार कार्ड बनवून देण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असताना शहरातील सेतू चालक आजूबाजूच्या परिसरात बांगलादेशीय रोहिंग्यांना कागदपत्र पुरवून आश्रय देत आहेत. एकाच सेतू चालकाच्या परवान्यावर अनेक सेतू चालक काम करीत आहेत. हेच सेतू चालक रोहिंग्यांना आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, शिधापत्रिका देखील काढून देत आहेत.

यामध्ये तहसील कार्यालयातील कर्मचारीही चिरीमिरीसाठी या सर्व कागदपत्रांना मंजुरी देत आहेत, असाही आरोप आमदार जगताप यांनी केला आहे. हा सर्व प्रकार गंभीर असून जिल्हाधिकाऱ्यांनी या जातीने लक्ष घालावे व बांगलादेशी घूसखोरांना आश्रय देणारे जे कोणी जिहादि वूत्तीचे सेतूचालक असतील अशांवर कारवाई करून सेतू केंद्रे रद्द करावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर तालुक्यात एका खडी क्रशरवर बांगलादेशमधून आलेले चौघे नागरिक आढळले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवले होते. मात्र त्यांच्याकडे आधारकार्ड, मतदान कार्ड, बँकेचे खातेपुस्तक आदी कागदपत्रे आढळली होती. गेल्या चार-पाच वर्षांपासून ते खडीक्रशरवर वास्तव्य करून होते.