अहिल्यानगर: ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत निवेदन देऊन केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकार आवश्यक ती मदत देईल, असे आश्वासन दिल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यात जोरदार पावसाने शेतकरी, नागरिक आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. सरसकट नुकसान भरपाई देताना ओला दुष्काळही जाहीर करण्याची मागणी आहे. यंदाच्या पावसाळ्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी व ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली. सप्टेंबर महिन्यात या आपत्तीचा अतिरेक झाला. नेवासे तालुक्यातील ५० टक्क्यांहून अधिक शेती पाऊस व पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झाली आहे. काढणी हंगामातील उभ्या पिकावर शेतकऱ्यांनी पाहिलेली सर्व स्वप्ने अक्षरशः वाहून गेली. अनेक नागरिकांच्या घराची पावसाने पडझड होऊन त्यांचे कौटुंबिक व व्यावसायिक साहित्य वाहून गेले आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
केवळ शेतकरीच नव्हे तर गावोगावचे छोट्या व्यापाऱ्यांचे दैनंदिन उपजीविकेची साधनसामग्रीही वाहून गेली. त्यांच्या जगण्याचा प्रश्नच उभा राहिला आहे. ही परिस्थिती तातडीची असून, लोकांना उभारी देण्यासाठी शासनाने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदतीची घोषणा करावी, अशी मागणी आमदार लंघे यांनी केली.नेवासा तालुक्याचे सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि भौगोलिक महत्त्व लक्षात घेता, नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाकडून शक्य तितकी जास्तीत जास्त मदत मिळायला पाहिजे, अशी भूमिका आमदार लंघे यांनी मांडली.
ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी आता सत्ताधारी पक्षाचे आमदारच आक्रमक झाले आहेत. यापूर्वी भाजप आमदार मोनिका राजळे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार काशिनाथ दाते व आता शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टीचा जिल्ह्यातील ७२१ गावांना फटका बसला आहे. २ लाख ३ हजार १०६ हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे तर सुमारे अडीच लाख शेतकरी त्यामुळे बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांचा दिवाळी सण जणू पाण्यातच वाहून गेला आहे. अशी परिस्थिती असतानाच जिल्ह्यात पुन्हा तीन दिवस अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आदींनी अतिवृष्टीने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.