महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमान कमालीचं वाढलं आहे. त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा हा अधिक चटके देणारा आणि ‘ताप’दायक ठरतो आहे. मुंबईसह उपनगरं आणि इतर शहरांमधल्या लोकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो आहे. तसंच आरोग्याच्या समस्याही जाणवत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी सरकारला पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली आहे.

काय आहे राज ठाकरेंचं पत्र?

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे.
मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.

विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करा

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी.

तसंच उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल.

हे पण वाचा- Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर

मनसैनिकांना विनंती

माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे.
त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा.

आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅलरीत, गच्चीत पाणी ठेवा.

आपला नम्र,

राज ठाकरे

राज ठाकरेंनी ही विनंती पत्र लिहून केली आहे. आता या मागणीचा सरकार विचार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.