राज्यात एकीकडे शिवसेना विरुद्ध शिंदे गट आणि शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगताना दिसत असताना आता शिवसेना विरुद्ध मनसे असा कलगीतुरा सुरू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत झालेल्या गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे गट, भाजपा, राज्य सरकार यांच्यावर तोंडसुख घेताना मनसेलाही खोचक टोला लगावला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा पुन्हा एकदा ‘मुन्नाभाई’ असा उल्लेख करत खोचक शब्दांत टोला लगावला होता. त्यावरून आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं असून उद्धव ठाकरेंना थेट ‘मामू’ अर्थात या चित्रपटातील बोमन इराणी यांच्या पात्राची उपमा दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“आता पुढच्या आठवड्यात कदाचित पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. मुंबई पालिका जिंकण्यासाठी स्वत: पंतप्रधान उतरत आहेत. केंद्रीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गृहमंत्री आहेतच. आपले गद्दार आहेतच. मुन्नाभाईही आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत”, असं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या गटनेता मेळाव्यात बोलले होते. यावरून आता मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे.

“…तर अशांना महाराष्ट्र सैनिक आपल्या पद्धतीने धडा शिकवतील”, राज ठाकरेंचा सूचक इशारा

गजानन काळेंचं ट्वीट

दरम्यान, उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी खोचक ट्वीट केलं आहे. “आदित्य ठाकरेंसाठी वरळीत मनसेचा उमेदवार न देता राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला. २०१२ ला एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ठाणे मनपात सेनेच्या महापौर पदासाठी मनसेच्या ७ नगरसेवकांचा बिनशर्त पाठिंबा दिला”, अशी आठवण गजानन काळेंनी उद्धव ठाकरेंना करून दिली आहे.

“मुन्नाभाईचं काळीज कळायला मामूला अजून सात जन्म घ्यावे लागतील. गेट वेल सून मामू”, असं या ट्वीटमध्ये शेवटी गजानन काळेंनी म्हटल आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns gajanan kale mocks uddhav thackeray as mamu in munnabhai movie pmw
First published on: 23-09-2022 at 11:14 IST