भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मी भाजपाची आहे, पण भाजपा थोडीच माझ्या एकट्याचा पक्ष आहे, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं. यावर आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “नागपूर हे भाजपाचं केंद्र बनलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नेते अस्वस्थ आहेत,” असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी सांगितलं की, ” मी भाजपाची आहे, पण भाजपा थोडाच माझ्या एकट्याचा पक्ष आहे. महादेव जानकरांचा स्वत:चा पक्ष आहे. तसा भाजपा कुणी एकट्याचा नाही. हा पक्ष खूप मोठा आहे. मी त्याची एक कार्यकर्ता आहे.”




हेही वाचा : “वादळ येणार होतं, पण त्याची दिशा…”, एकनाथ खडसेंबरोबरच्या बैठकीनंतर पंकजा मुंडेंचं विधान
“कर्नाटकातील निवडणुकीची परिस्थिती पाहता भाजपाने…”
यावर प्रकाश महाजन यांनी म्हटलं की, “पंकजा मुंडेंना मौन धारण करण्याचा सल्ला दिला आहे. कारण, पंकजा मुंडे काहीही बोलल्या तरी त्याची चर्चा होते. याची चर्चा का होते? याचा भाजपा विचार करत नाही. एका नेत्याची तुम्ही किती कोंडी करणार आहात? कर्नाटकातील निवडणुकीची परिस्थिती पाहता भाजपाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. एखाद्या नेत्याची तुम्ही कोंडी करत आहात, तर ते कुठे ना कुठे व्यक्ती होतील.”
“यापूर्वी पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर सुरूवातीला असायचा. आता दुसऱ्या क्रमांकावर असतो. पंकजा मुंडे यांच्या जागी दुसऱ्या नेत्यांना आणलं, त्यांची समाजात किती किंमत आहे? पाहून घ्या,” असेही प्रकाश महाजन यांनी सांगितलं.
हेही वाचा : “राष्ट्रवादीने विदर्भावर अन्याय केला, असं पसरवण्याचा प्रयत्न, पण…”, अजित पवारांचं नागपुरात विधान
काँग्रेसने पंकजा मुंडेंना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. यावर विचारल्यावर प्रकाश महाजन म्हणाले, “पंकजा मुंडेंचं महत्व इतरांना आहे, ते घरच्या लोकांना नाही. नागपूर हे भाजपाचं केंद्र बनलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नेते अस्वस्थ आहेत.”