मुंबई उपनगरातील मुलुंड परिसरात असलेल्या शिवसदन सोसायटीत मराठी असल्याच्या कारणावरून एका महिलेला घर नाकारण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. तृप्ती देवरूखकर या महिलेनं सोशल मीडियावरून या घटनेला वाचा फोडली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. अशातच भाजपा नेत्या, पंकजा मुंडे यांनी मुंबईत आपल्याला असाच अनुभव आला असल्याचं सांगितलं आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“माझं सरकारी घर सोडून दुसरं घर घ्यायचं होतं. तेव्हा, ‘मराठी लोकांना आम्ही घर देत नाही’ हा अनुभव माझ्यासारख्या व्यक्तीलाही बऱ्याच ठिकाणी आला. हे फार दुर्दैवी आहे. आत्ताचं राजकीय आणि सामाजिक वातावरण पाहता समाजात कुठेतरी अस्वस्थता वाटते. प्रत्येक रंगात माणूस वाटला गेला आहे,” अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : “…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

“मुंबईत सगळ्याचं स्वागत, पण…”

“मी कोणत्या एका भाषेची बाजू घेत नाही. कारण, मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषा, जात, धर्मानं नटलेलं आहे. ही देशाची राजकीय नसून आर्थिक राजधानी आहे. इथे सगळ्यांचं स्वागतच आहे. पण, आम्ही अमुक लोकांना घर देत नाही, असं जर काही इमारतींमध्ये बोलत असतील, तर हे दुर्दैवी आहे,” असेही पंकजा मुंडेंनी सांगितलं.

हेही वाचा : “फुकट मदत केली लोकांना वाटतं, हा मंत्री आहे याच्याकडे हरामाचा पैसा…”; नितीन गडकरींचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“‘त्या’ सोसायटीला धडा शिकवण्याचं काम मनसैनिक करतील”

पंकजा मुंडे यांच्या विधानावर मनसे नेते, संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तेव्हाच मनसैनिकांनी पंकजा मुंडे यांना घर मिळवून दिलं असतं. कुठल्या सोसायटीनं पंकजा मुंडेंना घर नाकारलं, हे त्यांनी सांगावं. त्या सोसायटीला धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्र सैनिक करतील,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.