सत्याचा मोर्चा मुंबईत निघाला होता. या मोर्चात मनसे आणि मविआचे नेते सहभागी झाले होते. मुंबईतल्या मलबार हिल या ठिकाणी भिवंडी, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, पालघर येथील मतदारांनी मतदान केल्याचा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. त्यानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मतदार यादीतल्या घोळांबाबत भूमिका मांडली. ज्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. तसंच मनसेच्या एक्स पोस्टवरही राज ठाकरेंनी केलेला दावा योग्यच होता असं म्हणत भाजपावर टीका करण्यात आली आहे.

आशिष शेलार यांनी काय म्हटलं आहे?

मी निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देणार नाही. पण प्रचलित कायदेशीर पद्धतीचा राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला विसर पडलेला दिसतो आहे. प्रचलित पद्धत अशी आहे की बूथ प्रमुख याने बूथमधल्या मतदारांचं ओळखपत्र बघावं. आम्ही ते करणार आहोत तुम्हीही करु शकता. हरकती आणि सूचना घेण्याची वेळ निवडणूक आयोगाने दिलं आहे. तुम्ही तेव्हा झोपला होतात. प्रचलित पद्धतीने मतदान प्रक्रिया होते. भोईर, पाटील, तांबोळी ही नावं घेऊ नका. मुस्लिम दुबार मतदारांवर राज ठाकरे गप्प का आहेत? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

मनसेची पोस्ट नेमकी काय?

यानंतर एका ओळीचं ट्वीट करत मनसेने आशिष शेलार यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंच्या दाव्यावर भाजपाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मतदार यादीत घोळ. अशी पोस्ट मनसे अधिकृतकडून करण्यात आली आहे.

आशिष शेलार मोर्चाला का आले नाहीत?

‘सत्याचा मोर्चा’ नंतर पायाखालची जमीन सरकलेल्या भाजप नेत्यांनी चक्क निवडणूक आयोगाच्या वतीनेच उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे… भाजपचे मुंबईचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन, पोकळ युक्तिवाद केला. त्यात त्यांनी दुबार मतदाराचा धर्म जात पुढे आणला… मतदाराकडे धर्म आणि जात म्हणून कसं बघता येईल? या पोकळ युक्तिवादाला पक्षाचे नेते, आणि मुंबई शहर अध्यक्ष श्री. संदीप देशपांडे यांनी सडेतोड उत्तरं दिली. जरूर ऐका… “दुबार मतदार आहेत हे आशिष शेलार मान्य करतात, मग जर तुम्हाला मान्य आहे मग आमच्या लढ्यात सामील व्हा… आशिष शेलार ‘सत्याचा मोर्चा’ ला का नाही आले ? आशिष शेलारांना मतदारांत पण जात दिसली.. आमच्यासाठी दुबार मतदार कोणत्या जातीचा आहे यापेक्षा त्याची नोंदणी दुबार आहे हे आणि ते काढलं पाहिजे.. आणि लोढांच्या मतदारसंघात, त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची नावं दोन दोन ठिकाणी आहेत… जर आशिष शेलार इतरांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत मग लोढांचा राजीनामा पण घ्या… “

आशिष शेलार यांच्या बुद्धीला गंज लागला आहे-संदीप देशपांडे

असंही ट्वीट मनसे अधिकृतने केलं आहे. दरम्यान संदीप देशपांडे यांनीही आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आशिष शेलार यांची बुद्धी आधी चांगली होती. आता त्या बुद्धीला गंज लागला आहे. कारण सध्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी त्यांना चांगलं मंत्रिपद दिलं नाही त्यामुळे हे असू शकेल. आम्ही जी दुबार मतदारांची यादी दाखवली त्यात हिंदूच मतदार आहेत इतर धर्माचे नाहीत हे शेलार कशाच्या आधारावर बोलत आहेत? असाही सवाल संदीप देशपांडेंनी केला आहे.