अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींन वेग आला आहे. शिंदे गट-भाजपाकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असे असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला ही निवडणूक न लढण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल पत्रकारपरिषदेत बोलताना ही निवडणूक बिनविरोध करावी असं म्हटलं. पवारांनी पत्रकारपरिषदेत हे विधान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे पवारांचे आभार व्यक्त केले. तर या पत्रानंतर आता मनेसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा : Andheri by-election : इतका छळवाद झाला तेंव्हा राज ठाकरे गप्प होते, आता…; अरविंद सावंतांचं विधान!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये संदीप देशापांडे म्हणतात, ‘राजसाहेब एक म्हण आठवली “कपटी भावा पेक्षा दिलदार शत्रू बरा”’

तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे आभार व्यक्त करणाऱ्या पत्रात म्हटले आहे की “राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे, हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. स्वर्गीय रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणूक लागली आणि शिवसेनेनं ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय केला. पण त्यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला. मात्र, न्याय देवतेने न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचं राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेलं आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, आर. आर पाटील, भाजपाच्या गिरकर ताई, यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरुन संबंधित पोटनिवडणुकीत शिवसेनेचा अधिकृत उमेदवार दिला नाही.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यातून शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय “यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाज आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचं काम केलं आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचं कार्य करेल, अशी मला खात्री आहे.” असंही उद्धव ठाकरेंनी पत्रकात म्हटलेलं आहे.