MNS Thane Rally Today : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सायंकाळी साडेसहा वाजता सभा होणार आहे. बहुचर्चित असलेल्या सभेला मनेसेने उत्तरसभा असं संबोधलं आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. गुढीपाडव्या दिवशी शिवतीर्थावर राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे, या भाषणात राज ठाकरेंनी मांडलेल्या मुद्य्यांवरून मोठ्याप्रमाणावर आरोप-प्रत्यारोपही झाल्याचे दिसून आले. शिवाय, मशिदींवरील भोंग्याच्या मुद्दा देखील चांगलाच पेटला, याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांची ठाण्यात आज सभा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सभेची जोरदार तयारी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. सुमारे ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता मनसेकडून वर्तविली गेली आहे. तसेच मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या शाब्दीक वादानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात ‘उत्तरसभा’ अशा आशयाचे फलक उभारले आहेत. त्यामुळे राज ठाकरे सभेत काय बोलणार? याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, या सभेच्या पार्श्वभूमीवर मनेसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक सूचक ट्वीट देखील केलं आहे. “राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर ज्यांना “लावरे तो व्हिडीओ”ची खूप आठवण येत होती, त्यांच्या साठी खास आजची उत्तरसभा.” असं संदीप देशपांडेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे या सभेच्या पार्श्वभूमीवर मनेसेकडून सभेचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आलेला आहे. ”करारा जवाब मिलेगा#उत्तरसभा” असा मथळा देत संदीप देशपांडे यांनी या अगोदर एक व्हिडिओ ट्वीट केला होता. या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीका दाखवण्यात आल्या आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

टीकेला राज ठाकरे देणार ‘करारा जवाब’; ठाण्यातल्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित

राज ठाकरे यांची ही सभा ९ एप्रिलला आयोजित करण्यात आली होती. परंतु चैत्र नवरात्रौत्सव आणि गडकरी रंगायतन येथील एका कार्यक्रमामुळे पोलिसांनी त्या दिवशी सभेसाठी परवानगी नाकारली. अखेर १२ एप्रिल रोजी (आज) ठाण्यातील डॉ. मूस मार्गावर ही सभा घेण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात आल्यानंतर आज सायंकाळी ही सभा होणार आहे.

३५ ते ४० हजारहून अधिक जनसमुदाय या सभेस उपस्थित असणार –

राज ठाकरे यांचे २०० चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांच्या रॅलीत आगमन होणार आहे. ही रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थानापर्यंत म्हणजेच डॉ. मूस मार्गापर्यंत असणार आहे. असे मनसेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. या सभेस ३५ ते ४० हजारहून अधिकचा जनसमुदाय या सभेस उपस्थित असणार आहे. मुंबई तसेच पालघर जिल्ह्यातून येणार या बसगाड्या, मोठी वाहने साकेत आणि आनंदनगर टोलानाका येथे उभ्या केल्या जाणार आहे. मनसेचे ५०० ते ६०० स्वयंसेवक या सभेसाठी उपस्थित असतील. सभेचे व्यवस्थापन या स्वयंसेवकांकडे असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader sandeep deshpandes tweet on the background of raj thackerays rally in thane msr
First published on: 12-04-2022 at 10:00 IST