करोना काळातील वीजबिलांच्या माफीबाबत सध्या आंदोलने करण्यात येत आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपानंतर आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यभरामध्ये वीजबिलवाढीविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तोडफोड करु नये असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. तरीही मनसे कार्यकर्त्यांनी हातामध्ये तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी असे फलक हाती घेऊन राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की पाहा >> ‘तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी’: मनसेच्या महामोर्चातील खास फोटो

मुंबई

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेने आज सकाळी दहाच्या सुमारास मोर्चा काढला. यावेळी मनसेचे नेते आणि शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे

पुण्यामध्ये आज सकाळी अकराच्या सुमारास मनसेकडून शनिवार वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केलं. याच पार्श्वभूमीवर शनिवार वाडा परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त टेवण्यात आला होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मनसे शहर अध्यक्ष अजय शिंदेसहीत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलीस मनसे कार्यकर्त्यांना फरासखाना पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेले. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा फरासखाना पोलीस स्थानकाकडे वळवला. आम्ही शनिवार वाडा येथून जिल्हाधिकारी कार्यालयकडे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार होतो. पण तुम्ही मोर्चा काढू दिला नाही. आम्हाला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आला आहात, आता जोवर या ठिकाणी जिल्हाधिकारी इथे येऊन आमच निवेदन स्वीकारणार नाही. तोवर आमच ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली. साडेबाराच्या सुमारास वीजबिलांसंदर्भातील निवेदन पोलिसांकडे देत पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

ठाणे

ठाण्यातही मनसेकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. मात्र करोनाचा प्रादुर्भाव शहरात कायम असल्याने ठाणे पोलिसांनी जमावबंदीचा आदेश कायम ठेवला. या आदेशानुसार पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा पाठविल्या असून त्यात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही आज ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये म्हणजेच अविनाश जाधव यांच्या नौपाड्यातील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कॅडबरी जंक्शन ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्याचं मनसेनं म्हटलं आहे. या मोर्चात ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील हजारो मनसे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने ठाणे पोलिसांनी शहरात अद्यापपर्यंत जमावबंदीचा आदेश कायम ठेवला आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमता येत नाही. मोर्चादरम्यान गर्दी होऊन कायद्याचे उल्लंघन होऊ  नये यासाठी बुधवारी रात्री पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटिसा पाठविल्या आहेत.

नवी मुंबई</strong>

नवी मुंबईमध्ये बेलापूर, ऐरोलीमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनात सहभाग नोंदवला. बेलापूरमध्ये कोकण भवनापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

नाशिक

नाशिकमध्येही राजगड कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा मनसेने काढला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या मोर्चात महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

औरंगाबाद

औरंगाबादमध्येही मनसेच्या वीजबीलवाढीविरोधातील मोर्चाला शेकडोच्या संख्येने मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. या मोर्चाला परवानगी नसल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केल्यानंतर मोर्चा पांगला. मात्र नंतर पुन्हा मोर्चा सुरु झाला. त्यानंतरही पोलिसांनी धरपकड सुरु केली. मात्र मनसेचे कार्यकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे दिसून आलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns protest against high electricity bills in different cities of maharashtra scsg
First published on: 26-11-2020 at 12:43 IST