मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेपूर्वी महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. १ मे रोजी होणाऱ्या या सभेमध्ये राज ठाकरे काय बोलणार? याविषयी उत्सुकता वाढली असताना आधी शिवसेना-राष्ट्रवादीसोबत वाकयुद्ध सुरू असणाऱ्या मनसेचा एमआयएमसोबत देखील कलगीतुरा रंगू लागला आहे. आज सकाळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलं. यावर मनसेकडून खोचक टोला लगावतानाच जलील यांना ‘काउंटर ऑफर’ देण्यात आली आहे!

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबाद पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी, “राज ठाकरे यांची इथे सभा होणार आहे, मी त्यांना एवढच सांगू इच्छितो की १ तारखेला तुमची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. साडे सात वाजता तुमची सभा आहे, त्या सभेपूर्वी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं आहे. हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन इफ्तार करु, यामधून एक चांगला संदेश जाईल”, असं जलील म्हणाले.

“..तर जलील यांना श्रीखंड-पुरीचं जेवण!”

दरम्यान, जलील यांच्या या निमंत्रणावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना नवीन ऑफर दिली आहे. “आमची त्यांना काऊंटर ऑफर आहे. मशिदींवरील सर्व भोंगे उतरवा. सर्व मनसे कार्यकर्ते त्यांचा सत्कार करतील आणि त्यांना आवडत असेल तर श्रीखंड-पुरीचं जेवण देखील देतील”, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यावेळी संदीप देशपांडे यांनी चंद्रकांत खैरेंना देखील टोला लगावला आहे. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं खैरे म्हणाले होते. त्यावर बोलताना, “चंद्रकांत खैरेंना एवढंच सांगेन की ते संभाजीनगरचं आऊटडेटेड नेतृत्व आहे. जुना नोकिया फोन आपण वापरत नाही तसा हा प्रकार आहे. असं बोलून ते अपग्रेड होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तसं होणार नाही”, असं संदीप देशपांडे म्हणाले.