भाजपाकडून सापत्न वागणूक मिळते असं बोललोच नाही तो शब्द माझ्या तोंडी घातला गेला असं आता गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे. मी जेव्हा खासदार होतो अडीच वर्षे तेव्हा त्या अडीच वर्षात भाजपा आणि शिवसेनेची युती संपली आणि महाविकास आघाडी सुरु झाली. तेव्हा त्या अडीच वर्षांच्या कालावधीत आम्ही एनडीएचे घटक पक्ष नव्हतो. एकनाथ शिंदेंनी उठाव केला, त्यानंतर आमची आणि भाजपाची युती झाली आता आम्ही एनडीएचे घटक आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. आम्ही खासदार म्हणून भाजपासह गेलो. त्यामुळे आम्ही आता एनडीएचे घटक आहोत हे केंद्रीय मंत्र्यांना कळलं की नाही? की आम्हाला ते अजून पूर्वीप्रमाणेच समजतात? इतकंच मला म्हणायचं होतं असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं आहे.
२६ मे रोजी काय म्हणाले होते कीर्तिकर?
गजानन कीर्तिकर म्हणाले, “आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदेंबरोबर आलो असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा ( एनडीए ) घटक पक्ष आहोत. यापूर्वी आम्ही एनडीएचा घटकपक्ष नव्हतो. त्यामुळे एनडीएचा भाग असल्याने आमची काम झाली पाहिजेत. घटकपक्षाला दर्जा दिला पाहिजे, ही आमची मागणी आहे. भाजपाकडून आम्हाला सापत्न वागणूक देण्यात येत आहे.” असं गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं होतं. मात्र आता मी असं बोललोच नाही असं म्हणत घूमजाव केलं आहे.




मागच्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १३ खासदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर भाजपाबरोबर जात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं. मात्र सरकारच्या वर्षपूर्तीच्या आतच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये खटके उडू लागले आहेत का? याच्या चर्चा कीर्तिकरांच्या वक्तव्यामुळे सुरु झाल्या होत्या. भाजपाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा दावा कीर्तिकरांनी केलाय.. एनडीएमध्ये घटकपक्षांना सापत्न वागणूक मिळतेय असं कीर्तीकर म्हणाले होते. आता मात्र त्यांनी घूमजाव केलं आहे.