बीड – फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निवृत्त न्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी अशी मागणी करत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण हे अस्वस्थ करणारे असून ही आत्महत्या आहे की, हत्या हे सगळ्या महाराष्ट्राला समजले पाहिजे.या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाकडे सरकारने माणुसकीने पहावे, अशी विनंती केली. डॉक्टर कुटुंबीयांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘या प्रकरणात असंवेदनशील आणि गलिच्छ वक्तव्य केले जात आहेत. हे अस्वस्थ करणारे आहेत. या प्रकरणात जे विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले. ते परिपूर्ण नाही, असे कुटुंबाचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या कानावर हा विषय घातला आहे. न्यायाधीशांच्या नेतृत्वात ही एसआयटी स्थापन करावी आणि यात कुठलेही राजकारण होऊ नये. तपासाचे काम पारदर्शकपणे व्हावे, अशी आमची मागणी असल्याचे खासदार सुळे म्हणाले.

या प्रकरणात आम्ही कुठलाही राजकीय दबाव येऊ देणार नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधी कुणालाही निर्दोष ठरवू नये. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात बोलणाऱ्यांना आवरलं पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षाच्या वक्तव्यावर आम्ही नाराजी व्यक्त केली असून यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा तो त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा भाग असल्याचेही सुळे म्हणाल्या.