केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर येऊन गेले. शाह यांनी मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. तसेच भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंद दाराआड बराच वेळ चर्चा केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांबाबत दोघांमध्ये खलबतं झाली असल्याचं सांगितलं जात आहे. बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, वरिष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम, प्रतापराव दिघावकर आणि भाजपा नेते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देवधर यांना भाजपाकडून उमेदवारी देण्याबाबत फडणवीस आणि शाहांमध्ये चर्चा झाली असल्याचं सांगितलं जात आहे.

काही वृत्तपत्रांनी दावा केला आहे की, विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना जळगावातून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपा बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते. तर भाजपाकडून प्रतापराव दिघावकरांना धुळे आणि सुनील देवधर यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उज्ज्वल निकम यांना जळगावातून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. यावर जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार उन्मेश पाटील म्हणाले, पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी बांधील आहे. मी पक्षाशीच बांधील आहे. आपल्याला काम करायचं आहे, त्यासाठी हेतू महत्त्वाचा आहे. पद महत्त्वाचं नाही. आमदारकी, खासदारकी हे साधन म्हणून आहेत, ते काही जीवनाचं साध्य नाही.

हे ही वाचा >> मध्य प्रदेशात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, ३ केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदारांना उतरवलं मैदानात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासदार उन्मेश पाटील म्हणाले, चांगलं काम करण्यासाठी आमदार खासदार व्हायचं असतं. नुसतं मिरवायला आमदार-खासदार व्हायचं नाही. मी भाजपाचा कार्यकर्ता आहे, सैनिक आहे. पक्षाचा आदेश माझ्यासाठी शिरसावंद्य आहे. त्यामुळे कोणी चुकीच्या वावड्या उठवू नये. काही झारीतले शुक्राचार्य अशा गोष्टींना वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी मात्र भाजपाचा प्रामाणिक सैनिक म्हणून काम करतोय.