आजच्या MPSC परीक्षेसाठी रेल्वेचा लोकलसंदर्भात मोठा निर्णय

राज्यात आज ४ सप्टेंबरला होणाऱ्या एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

MPSC Exam 2021 September 4
परीक्षा 4 सप्टेंबरपासून सुरू होईल

कोरोना महामारीमुळे लोकल गाड्या मुंबईत सर्वसामान्यांसाठी अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. केवळ अत्यावश्यक सेवांमधील लोक आणि ज्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत ते लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात. त्यासाठी विशेष पास जारी करणे आवश्यक आहे. मात्र, राज्यात आज ४ सप्टेंबरला होणाऱ्या एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वेने उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना एक दिवसाचा पास दिला जाईल.

मध्य रेल्वेने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ४ सप्टेंबर रोजी मुंबई महानगर प्रदेशातील विविध केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या वैध हॉल तिकीट असलेल्या उमेदवारांना रेल्वे ४ सप्टेंबर रोजी लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी तिकीट देईल.
मात्र, परीक्षार्थीला हॉल तिकीट असणे बंधनकारक आहे. हॉल तिकीट दाखवल्यानंतरच लोकलची तिकिटे मिळतील, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.

११ एप्रिलला होणार होती परीक्षा

यावर्षी ११ एप्रिलला होणारी एमपीएससी परीक्षा कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे ४ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. MPSC ८०६ पदांच्या रिक्त जागा भरेल ज्यात प्रशासकीय, वित्त आणि गृह विभागाचा समावेश आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी २,००० आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षांसाठी १,००० OBC विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी सांगितले.

औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री म्हणाले की, दरवर्षी २५ विद्यार्थ्यांना पायलट प्रशिक्षण देण्यासाठी विमान कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mpsc exam 2021 starts september 4 show hall ticket and get discounts on local railway ticket central railway twitted ttg