एसटीचे खासगीकरण ? ; चाचपणीसाठी महामंडळाकडून खासगी संस्थेची नियुक्ती

तीन आठवडे उलटले तरी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

सुशांत मोरे, लोकसत्ता

मुंबई : संपाचा तिढा कायम आता असताना एसटीचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून, याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब आणि एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

करोनाची साथ आणि निर्बंधांमुळे गेल्या वर्षांपासून प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणेही मंडळासाठी अवघड बनले. सणासुदीच्या काळात तरी उत्पन्न मिळेल, या आशेवर महामंडळ असतानाच ऐन दिवाळीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे महामंडळाला प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

गेल्या चार वर्षांत घटलेली प्रवासी संख्या, करोनाच्या साथीचा फटका, संप आदींमुळे एसटीचे आर्थिक चाक आणखी खोलात रुतले. एसटीचे वार्षिक प्रवासी उत्पन्न सात ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र, त्या तुलनेने खर्च अधिक असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती खालावत गेलीे. या पार्श्वभूमीवर एसटीला तोटय़ातून नफ्यात आणण्यासाठी महामंडळ पर्याय शोधू लागले असून, आता खासगीकरणाचा विचार करण्यात येत आहे.

याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात महामंडळाची आगारे व अन्य जागा आहेत. त्याचा योग्यरितीने कसा वापर करता येईल, कामाच्या तुलनेत एसटीतील मनुष्यबळ अधिक आहे का, असल्यास त्याबाबत नेमका उपाय काय, ते कमी करणे योग्य आहे का, स्वमालकीच्या बस घेणे योग्य की भाडेतत्त्वावरील बसचा पर्याय असावा, खासगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घ्यावे की नाही, आदींबाबत ही संस्था अभ्यास करणार आहे.

प्रवासी दुरावण्याची भीती

तीन आठवडे उलटले तरी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असली तरी प्रवासी रेल्वे, खासगी बस व अन्य पर्यायांकडे वळत आहेत. त्यामुळे आधीच तोटा वाढत असताना नियमित प्रवासीही दुरावण्याची भीती महामंडळाला आहे. त्यामुळे महामंडळाने संपकाळातच खासगीकरणाचा पर्याय शोधला असून त्याचा अभ्यास सुरु केला आहे.

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक

’एसटीला २०१९-२० मध्ये ७ हजार ८७० कोटी ९९ लाख रुपये उत्पन्न मिळाले. मात्र, खर्च ८ हजार ७९० कोटी २० लाख रुपये इतका होता.

’२०२०-२१ या वर्षांत करोनामुळे एसटी डबघाईलाच आली. या वर्षांत एसटीचे उत्पन्न २ हजार ९८८ कोटी १ लाख रुपये तर खर्च मात्र ६ हजार ४४९ कोटी रुपये २३ लाख रुपये झाला.

एसटीचा तोटा वाढतच आहे. एसटीला तोटय़ातून नफ्यात आणण्यासाठी महामंडळाचा प्रयत्न आहे. त्याचाच अभ्यास करण्याचे काम एका खासगी संस्थेला दिले आहे. – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Msrtc privatisation appointment of private organization indicate msrtc towards privatization zws