BJP Mla Mukta Tilak Death: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज (गुरुवार) निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारतीय जनता पार्टीच्या ध्येयनिष्ठ कार्यकर्त्या, विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शांती. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मुक्ताताई पुण्याच्या माजी महापौर सुद्धा होत्या. त्यांनी अनेक विकास कामात मोठे योगदान दिले. पक्षाबद्दल त्यांची प्रतिबद्धता ही अवर्णनीय अशीच होती.”

याशिवाय, “अलिकडे झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी न येण्याची विनंती करून सुद्धा आणि त्यांची प्रकृती साथ देत नसतानाही त्या रुग्णालयातून आल्या होत्या. सुमारे ३० वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुणे भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा, नगरसेविका, महापौर आणि आमदार अशा विविध भूमिकांमधून त्यांनी पुण्याचा विकासात मोठे योगदान दिले. संघटनेसाठी त्यांनी बजावलेले कर्त्यव्य आणि ध्येयनिष्ठा हा सर्वांसाठीच आदर्श असेल.” अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुक्ता टिळक यांच्या पश्चात पती शैलेश, मुलगा कुणाल आणि मुलगी चैताली असा परिवार आहे. उद्या सकाळी ९ ते ११ या वेळेत केसरीवाडा येथील राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वैकुंठ स्मशामभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.