लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर येथील देवदर्शन आटोपून परत निघालेल्या एका पोलीस हवालदाराच्या कुटुंबीयांच्या मोटारीला अपघात होऊन त्यात मुंबईच्या पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या कुटुंबातील चिमुकल्यासह तिघेजण जखमी झाले. सांगोला तालुक्यातील कोळे ते पाचेगाव रस्त्यावर दुपारी साडेचारच्या सुमारास अपघात झाला.
रणरणत्या उन्हात मोटार धावत असताना अचानक टायर फुटल्याने मोटार हा अपघात झाला. महादेव अश्रुबा सोनवणे (वय ५३, रा. नागपाडा, मुंबई) असे या अपघातातील मृत पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्यांच्या पत्नी जनाबाई सोनवणे (वय ४५), कन्या वर्षा अरविंद दराडे (वय २६) आणि नातू दक्ष अरविंद दराडे (वय ७ महिने) हे या अपघातात जखमी झाले.
मूळचे चिंचपूर (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथे राहणारे मृत हवालदार महादेव सोनवणे हे मुंबईत नागपाडा पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर येथे जाऊन देवदर्शन करण्याचा बेत आखला होता. त्यानुसार ते स्वतः आणि कुटुंबीय एका मोटारीतून (एमएच ०३ ईएफ २४०१) आले होते.
तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर आणि पंढरपूर येथील देवदर्शन आटोपल्यानंतर सोनवणे कुटुंबीय आटपाडी, विटा (जि. सांगली) मार्गे मुंबईला परतण्यासाठी निघाले होते. वाटेत सांगोला तालुक्यातील कोळे-पाचेगाव रस्त्यावर त्यांची मोटार अचानकपणे टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात आदळली आणि दोनवेळा पलटी झाली. या अपघातात पोलीस हवालदार सोनवणे यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. सांगोला पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.