चिपळूण– गणरायाच्या आगमनाला आता काही दिवस उरले आहेत. मुंबईतील चाकरमानी गावाला येण्यास सुरुवात झाली आहे.  रस्त्याने कोकणात यायचे तर प्रत्येक चौकात कंबर मोडणारे खड्डे आहेत आणि रेल्वेने यायचे तर त्या भरगच्च आहेत. कोकण रेल्वे प्रकल्प अवघ्या आठ वर्षांत पूर्ण होतो, मग मुंबई-गोवा महामार्ग १६ वर्षे झाली तरी पूर्ण का होत नाही ? असा सवाल चाकरमानी विचारू लागले आहेत. 

कंत्राटदार बदलले तरी बांधकामाची गुणवत्ता कमी आणि खर्च कायम वाढत राहिला आहे. आज ३००० ते ७००० कोटी खर्च करूनही हा रस्ता अधुराच आहे. कंत्राटदार कोणामुळे पळून गेले? अर्धवट कामे टाकून गेल्यावर त्यांच्यावर काय कारवाई झाली? त्यांच्या कंत्राटावर कोणी कोणी मलिदा खाल्ला? कोण कोण राजकारणी या कंत्राटदारांचे सगेसोयरे आणि भागीदार होते? या सगळ्याची इत्थंभूत माहिती सगळ्यांकडे आहे. पण कोणीच त्याबाबत काहीच बोलत नाही. कारण सगळ्यांचेच हात मळलेले आहेत या रस्त्याच्या कंत्राटात. इकडे मुंबईचा चाकरमानी मात्र गणेश उत्सवात आपापल्या गावी येताना या रस्त्यावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. कधी त्यासाठी मुंबई-पुणे-कोल्हापूर-संखेश्वर (कर्नाटक) करत आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जातो, तर कधी मुंबई-कराड-ओणी करत अणुस्कुरा घाटातून राजापूर गाठतो आणि पुढचा प्रवास करतो. आंबा घाट, फोंडा घाट, करूळ घाट करत देखील रत्नागिरी-सिंधुदुर्ग गाठता येते. त्यामुळे कुठच्या ना कुठच्या मार्गाने चाकरमानी कोकणात पोहोचत आहेत. 

गेली १६ वर्षे मुंबईचे चाकरमानी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्याची वाट बघत आहेत. गणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी त्यांना मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याचे आश्वासन दिले जाते, प्रवास सुखाचा होईल, असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही. सरकारी आश्वासनानुसार सप्टेंबर २०२५ पर्यंत रस्ता खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे, पण एका अहवालात २०२७ पर्यंत तो पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

चिपळूण तालुक्यातील  पेढे गावात मागील वर्षी रस्ता कोसळला. तेव्हा तात्पुरते प्लास्टिक शीट आणि फिलर लावले, पण या ठिकाणचे कामाचे पुनर्निर्माण रखडले आहे. परशुराम घाटात धोकादायक भाग आहे. पावसाळ्यात १.५ किमीचा रस्ता एका लेनवर पिळवटला जातो. मलबा साफ करणे आणि ट्रॅफिक व्यवस्थापनामुळे अनेक समस्या समोर येतात. 

चौदपरीकरण कामामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या परशुराम घाटातील समस्या कायमच्या निकाली काढण्यासाठी नवा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभाग तयार करत आहे. त्यासाठी लोणावळा, खंडाळा घाटाच्या धर्तीवरचा ‌‘व्हाया डक्ट‌’ पूल परशुराम घाटात उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे हे काम सुरू होऊन पूर्ण होण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागेल हे निश्चित सांगता येत नाही.

संगमेश्वर, रत्नागिरी येथील कांटे गावचे बांधकाम रखडले आहे, रस्ता खराब अवस्थेत असल्यामुळे अपघातात जखमी होण्याची शक्यता आहे. कशेडी घाट द्विन टनेल जवळपास पूर्ण असले तरी पाणी गळती आणि इलेक्ट्रिकल समस्या असल्याने रस्त्यात आणि बोगद्यात काय होईल याचा नेम नाही. आंबा घाट आणि इतर भागात रस्ता खराब, सतत वळणे असून खड्डे तर पाचवीला पूजलेले आहेत. 

पावसामुळे काम थांबते. डोंगराळ भागात भूस्खलन आणि माती सरकण्याचे प्रकार घडतात. त्यात सतत वाहतूक सुरू असल्याने काम करता येत नाही, सर्व्हिस रोड खराब होतात. खड्डे भरून तात्पुरती वाहतूक सुरू करणे शक्य होत नाही. चाकरमान्यांना त्रासाचा प्रवास यावर्षी शेवटचा असेल. – सतीश मोरे, जिल्हाध्यक्ष भाजप उत्तर रत्नागिरी