हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली रस्त्यांची कामे ३१ डिसेंबर २०२३पूर्वी पूर्ण होतील, असे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सांगण्यात येत होते. मात्र, ती मुदतही टळून गेली. आता उच्च न्यायालयाने डिसेंबर २०२४ची मुदत दिली खरी; पण सध्या ही कामे कुठवर पोहोचली आहेत, याचा ‘लोकसत्ता’ने घेतलेला आढावा.

विलंबाची कारणे

पर्यावरणविषयक परवानग्या मिळण्यास झालेला उशीर, भूसंपादनाची रखडलेली कामे, कंत्राटदारांची निष्क्रियता आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे कामे रखडली आहेत.

हेही वाचा >>> ‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा अवमान कारवाई होणार’ उच्च न्यायालयाचे निर्देश

रत्नागिरीतील पुलांना विलंब

आरवली येथील गड नदीवरील पूल आणि संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्याचबरोबर संगमेश्वरपासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर सप्तशृंगी नदी आणि २० किलोमीटर अंतरावरील बावनदी येथील पुलांचेही काम अपूर्ण अवस्थेत आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत तर हे वर्षअखेर उजाडेल, अशी शक्यता आहे. त्याचप्रमाणे निवळी घाटातील कामही बऱ्याच प्रमाणात बाकी आहे. तेथून पुढे लांजापर्यंतचे काम वेगाने पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. पण प्रत्यक्ष लांजा बाजारपेठेतील उड्डाण पूल रखडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिपळूण उड्डाणपुलाच्या कामाला वर्ष लागणार?

चिपळूणजवळ परशुराम घाटातील धोकादायक आणि आव्हानात्मक कामही पावसाळ्यानंतर झपाट्याने पूर्ण होत आले असून घाटातील दोन्ही मार्गिका लवकरच पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. पण चिपळूण येथील बहादूर शेख नाक्याजवळ उड्डाण पुलाच्या बांधकामाचे गर्डर गेल्या ऑक्टोबर महिन्यात कोसळून झालेल्या अपघातामुळे या टापूतील कामाचे वेळापत्रक एक वर्षाने पुढे गेले आहे.