साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. दरम्यान, आता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी काही कडक पावलं उचलली आहेत. मुंबई पोलिसांकडून सोमवारी (१३ सप्टेंबर) काही महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत. शहरातील रेल्वे स्थानकं, महिलांची सार्वजनिक स्वच्छतागृहं आणि निर्जन क्षेत्रांच्या बाहेर सुरक्षा आणि रात्रीची गस्त वाढवण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी जारी केले आहेत. मुंबईतील साकीनाका येथे शुक्रवारी पहाटे एका ३४ वर्षीय महिलेवर अमानुष लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. आरोपी मोहन चौहान याने पीडितेच्या गुप्तांगावर गंभीर जखमा केल्या होत्या. उपचारांदरम्यान पीडितेचे शनिवारी सकाळी राजावाडी रुग्णालयात निधन झाले.

साकीनाक्यामधील ही भीषण घटना ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर शहरात एका १४ वर्षीय मुलीवर ३५ वर्षीय व्यक्तीने रेल्वे परिसरात बलात्कार केल्याची माहिती रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी रविवारी दिली आहे. श्रीकांत गायकवाड उर्फ ​​दादा या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली आहे. या घटनांमुळे, मुंबई-ठाण्यासह संपूर्ण राज्य हादरून गेलेलं असताना गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी काही ठोस पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. आता शहरात एका ठिकाणी बराच वेळ पार्क केलेल्या कोणाच्याही मालकीच्या नसलेल्या वाहनांवर आणि टेम्पोवर पोलिसांचं पूर्ण लक्ष असणार आहे. याशिवाय, निर्जन ठिकाणी क्यूआर कोडची तरतूद असेल.

आरोपीने कबूल केला आपला गुन्हा

“आता स्थानिक पोलिसांकडे लैंगिक गुन्हेगारांची यादी असेल. तर ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल,” असं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, साकीनाका प्रकरणातील आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे आणि त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सोमवारी दिली आहे. हेमंत नागराळे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने आपल्या कबुलीजबाबात म्हटलं होतं की तो पीडितेला ओळखत होता. तिने तिच्याकडून काही गोष्टींची मागणी केली होती. त्यानंतर, या प्रकरणावर चर्चा करत असताना महिला आणि त्याच्यात वाद झाला आणि त्याने हे अमानुष कृत्य केलं.

CCTV कॅमेऱ्यांचं जाळं वाढवणार

साकीनाका येथील घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. मुंबई शहरात ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ७ हजार कॅमेरे बसविण्याचं सुरु आहे. त्याचप्रमाणे, शहरातील सर्व मॉल्स, संस्था, दुकाने यांना रस्त्याच्या दिशेकडील कोनात कॅमेरे बसवणं आवश्यक करण्यात आलं आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे.