शाहूवाडी तालुक्यातील सहा वर्षीय आरव या बालकाच्या खुनाचे रहस्य उलगडले आहे. हा खून नरबळी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कौटुंबिक वादातून बापानेच मुलाची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. शाहूवाडी तालुक्यामधील वारणा कापशी येथे ३२ वर्षीय राकेश केसरे या नराधम जन्मदात्यास आरवच्या हत्येप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
राकेश केसरे व त्यांची पत्नी यांच्यात वारंवार कौटुंबिक वाद होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या वादातून हा खून झाल्याची शक्यता असावी, असा कयास पोलिसांचा झाला. राकेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बुधवारी उशिरा खूनाची कबुली दिली. पाच ऑक्टोबर रोजी या मुलाचा मृतदेह सापडला होता. त्यावेळी मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
नक्की काय घडलं?
पत्नी शेजारच्या घरामध्ये श्राद्धासाठी गेली असल्याने तिला बोलावून आण म्हणून राकेशने मुलगा आरवला सांगितले. पण आरवने नकार दिल्यामुळे रागाच्या भरात शेजारीच असलेला हातोडा फेकून मुलाला मारला. यामध्ये हातोडा आरवच्या डोक्याला वर्मी लागून तो जागीच बेशुद्ध पडला. त्यानंतर राकेशने मुलगा बेशुद्धावस्तेत असताना गळा आवळून त्याचा खून केला.
कारण ऐकून पोलीस थक्क
राकेश हा बांधकाम कामगार होता. घरापासून जवळच तो एका सेंटरच्या बांधकामाच्या स्थळी काम करीत होता त्याठिकाणी त्याची साधनाशी ओळख झाली. नंतर या दोघांचा विवाह झाला. या उभयतांना रुद्र नावाचा पहिला मुलगा झाला होता. नंतर त्यांना दुसरा मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी आरव ठेवलं होतं. आरवचा चेहरा वेगळाच आहे या संशयाने राकेशला पछाडले होते त्यातूनच त्यांनी निरागस आरवला संपवलं. त्यामुळे ही घटना नरबळी असल्याची शंका संपुष्टात आली आहे. हे कारण ऐकून पोलीसही थक्क झालेत.