बीड: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला चालू ऑक्टोबर महिन्यातच दोन वर्षे पूर्ण होत आहेत, तर वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांचे विशेष पथक नियुक्त करूनही दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. त्यानंतरही यातील तपासात काय गती घेतली, याची माहिती पुढे येऊ शकली नाही.
या पार्श्वभूमीवर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे प्रकरणात लक्ष घालून ज्ञानेश्वरी मुंडे व कुटुंबीयांची परळीत भेट घेतली. नंतर बीडला एक मेळावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी मुंडे कुटुंबियांना भेटण्याची वेळ देऊन विशेष तपास पथक नियुक्त करावे, अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्ञानेश्वरी मुंडे व कुटुंबीयांना भेट देण्याची वेळ देऊन महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात येईल, अशी घोषणा केली. या संदर्भाने अध्यादेश निघाला.
कुमावत यांनी स्वतः परळीत येऊन तपासाच्या अनुषंगाने भेटीही घेतल्या. एकीकडे हे पथक गेली दोन महिन्यापासून या खून प्रकरणाचा तपास करत आहे. तर दुसरीकडे मात्र या प्रकरणाला दोन वर्ष होत असताना अद्याप या प्रकरणात आरोपी निष्पन्न झाले नसल्याची खंत व्यक्त करत या प्रकरणात पुन्हा मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली आहे.
या प्रकरणात काही जवाब नोंदवण्यात आल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना या प्रकरणात मनोज जरांगे, बजरंग सोनवणे, खासदार सुप्रिया सुळे आमदार सुरेश धस आमच्या सोबत असताना देखील आरोपी अटक होत नाहीयेत, अशी खंत त्यांनी बोलावून दाखवत जोपर्यंत आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत न्यायचा लढा सुरूच राहणार असल्याचे मुंडेंनी सांगितले आहे.