नांदेड : भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्वामध्ये प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी तीन आठवड्यांपूर्वी ५८ जिल्हाध्यक्षांची नावे मुंबईहून जाहीर केल्यानंतर शनिवारी उर्वरित जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली असून नांदेड उत्तर आणि दक्षिण संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये ॲड. किशोर देशमुख आणि डॉ. संतुकराव हंबर्डे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपासून भाजपामध्ये वेगवेगळ्या स्तरावरील निवड-निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. बूथ कमिट्या, बूथ अध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांच्या निवडीचा सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी अर्हताही ठरवून दिली होती. यापूर्वीच्या यादीमध्ये नांदेड महानगराध्यक्षपदी अमर राजूरकर यांना प्रभारी अध्यक्षपदावर कायम करण्यात आले होते.
पक्षामध्ये नांदेड उत्तर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. त्यात महिलांसह अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील कार्यकर्त्यांचीही नावे समोर आली होती. उत्तर ग्रामीण जिल्ह्यात खा.अशोक चव्हाण यांच्या समर्थकांपैकी एखाद्याची नियुक्ती होईल, असे अपेक्षित होते. पण पक्षाने माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणार्या ॲड.किशोर देशमुख यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे.
नांदेडच्या ग्रामीण भागासाठी भाजपाने दोन संघटनात्मक जिल्हे केल्यानंतर नांदेड दक्षिणच्या अध्यक्षपदी डॉ.संतुक हंबर्डे यांची नियुक्ती दीड वर्षांपूर्वी करण्यात आली होती. नंतर त्यांना लोकसभेसाठीही उमेदवारी देण्यात आली; पण त्यांचा निसटता पराभव झाला. डॉ.हंबर्डे यांच्या जागी पक्षाचे जुने कार्यकर्ते श्रावण भिलवंडे तसेच आ.राजेश पवार यांच्या पत्नी पूनमताई पवार यांची निवड करण्यात यावी यासाठी पक्षातील काहींनी जोर लावला होता; पण पक्षनेतृत्वाने शेवटी हंबर्डे यांनाच आणखी एक संधी दिली.
प्रदेश निवडणूक अधिकारी आ.चैनसुख संचेती यांनी शनिवारी २२ जिल्हाध्यक्षांची नावे मुंबईवरून जाहीर केली. त्यावरून ३६ जिल्ह्यांच्या महाराष्ट्रात भाजपाने ८० संघटनात्मक जिल्हे निर्माण केले आहेत, असे दिसते. मराठवाड्यातील लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी या जिल्ह्यातल्या अध्यक्षांची नावेही जाहीर झाली आहेत. किशोर देशमुख व डॉ.हंबर्डे यांची फेरनिवड झाल्याबद्दल भाजपात नव्यानेच आलेल्या बी.आर.कदम यांनी स्वागत केले आहे.